*मांजरा साखर कारखान्याकडून गळीत हंगाम 2025 -26 मध्ये गाळपास आलेल्या उसाला प्रति मेट्रिक टन रुपये 327.62 प्रमाणे अंतिम हप्त्याचे ऊस बिल खात्यावर जमा*
*गळीत हंगाम 2025 -26 साठी ऊस तोडणी वाहतूक खर्च वजा जाता मांजरा कारखान्याचा रुपये 3177.62 प्रति मेट्रिक टन प्रमाणे अंतिम ऊस दर निश्चित*
लातूर दि. 10. राज्यातील सहकारी साखर कारखानदारीत मधील केवळ राज्य नाही तर देश पातळीवर नावलौकिक मिळवलेल्या लातूर तालुक्यातील विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम कारखान्याचे चेअरमन माजी मंत्री श्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या संपन्न झाला.
कारखान्याने गळीत हंगाम 2025 -26 मध्ये 7,15,409.410 मॅट्रिक टन उसाचे गाळप केले असून 5,88,540 क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. ज्यूस सिरप व बी हेवीसह सरासरी साखर उतारा 12.30% प्राप्त झाला आहे. कारखान्याने आज अखेर 2,98,49,508 युनिट्स विजेची निर्यात केली आहे.सध्या अर्कशाळा विभाग सुरू असून, आज अखेर अर्कशाळा प्रकल्पामधून 2,14,89,619 लिटर्स इथेनॉल उत्पादन झाले असून त्यापैकी 1,80,30,000 लिटर्स इथेनॉल चा पुरवठा ऑइल कंपन्यांना केला आहे, तसेच 2,37,34,095 लिटर्स अल्कोहोल चे उत्पादन झाले आहे व 1,24,093.35 किलो सीबीजी चे उत्पादन झाले आहे.

*ऊस पुरवठादार शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण*
महाराष्ट्र शासनाच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग यांच्या शासन निर्णय क्रमांक/1124/प्र. क्र.176/25, मंत्रालय मुंबई दिनांक 15/ 4 /2026 च्या शासन निर्णया द्वारे गळीत हंगाम 2025 -26 करिता एफ आर पी ऊस दर निश्चित करताना मागील हंगाम 2024 -25 चा अंतिम साखर उतारा व अंतिम ऊस तोडणी व वाहतूक खर्च विचारात घेऊन एफ आर पी निश्चित करावयाची आहे.त्याप्रमाणे मांजरा कारखान्याचा गळीत हंगाम 2025- 26 मध्ये कारखान्यास गाळपासाठी दिलेल्या उसासाठी मागील हंगामातील तोडणी वाहतूक खर्च वजा जाता व मागील हंगामातील प्रमाणीत करून दिलेला उतारा गृहीत धरून रु.3177.62 प्रति मेट्रिक टन इतका अंतिम ऊस दर निश्चित झाला आहे. कारखान्याने गळीत हंगाम 2025- 26 साठी यापूर्वी ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना रुपये 2850/-प्रति मेट्रिक टन प्रमाणे ऊस बिल अदा केलेल आहे,ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना देय असलेल्या एफआरपी पैकी रुपये 327.62 प्रति मेट्रिक टन प्रमाणे अंतिम ऊस बिल कारखान्याचे चेअरमन तथा माजी मंत्री सहकार महर्षी श्री दिलीपराव देशमुख यांच्या आदेशाने दिनांक 10/06/ 2026 रोजी ऊस पुरवठादारांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे, अशी माहिती कारखाना व्यवस्थापनाने दिली आहे. तसेच आपल्या संबंधित बँक शाखेची संपर्क करण्याचे आव्हान केले आहे त्यामुळे ऊस पुरवठादार शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पहावयास मिळत आहे.




