39.1 C
Pune
Wednesday, May 13, 2026
Home दैनंदिन दिन विशेष

दिन विशेष

0
356

१ ॲागस्ट १९२०

  • टिळकांचे निधन

टिळकांचा अखेरचा आजार फारच क्लेशदायक होता. साधारणपणे जुनमध्ये सिंध प्रांतात त्यांनी भयंकर उन्हाळयात दौरा काढला. तिथे बर्फाचे पाणी पिऊन त्यांना खोकल्याचा त्रास सुरू झाला. त्यानंतर ताईमहाराज केसचे (ताईमहाराज केस हा टिळकांच्या आयुष्यातील मनस्तापाचा खटला) हायकोर्टातील काम चालवण्यासाठी बॅ. जिना यांना स्वत: कैफियत तयार करून दिली. त्याचाही त्यांना खूप त्रास झाला. त्यांना थकवाही आला होता म्हणून शेठ चमनलाल यांनी त्यांना उघड्या मोटारीतून फिरायला नेले. पण त्यांना वारा सहन झाला नाही आणि सडकून ताप भरला. दुर्दैवाने तो ताप न्युमोनियाचा ठरला. टिळक अर्धवट ग्लानीत गेले. ताप उतरायची चिन्हे दिसेनात. घाईघाईने त्यांच्या मुली भेटायला आल्या. तेवढ्या आजारपणातही टिळकांची विनोदबुध्दी कायम होती. ‘जमल्या का तुम्ही ? उठसुठ माहेरी यायची तुम्हाला सवयच आहे.’ २७ जुलैला धोंडोपंतांनी घरच्या व्यवस्थेबद्दल विचारले तेव्हा ‘वेडा का काय तू ? मी अजून पाच वर्ष तरी मरत नाही ‘ असे ठणकावून सांगितले. दुर्दम्य इच्छाशक्तीचे याहून वेगळे उदाहरण काय असु शकते. २८ जुलैपासून मात्र त्यांची शुध्द हरपू लागली.

बेशुध्दीच्या अवस्थेतही त्यांच्या डोक्यात आपल्या अंगीकृत कार्याशिवाय दुसरी कोणतीही गोष्ट येऊ नये ही कर्मयोग्याच्या समाधीची पराकाष्ठा होय असे त्यांचे नातू ग. वि. केतकरांनी म्हटले आहे.‘ १८१८ साली असे झाले. आता १९१८ साल आले. १०० वर्षात आम्ही असे हीन झालो. ‘

कधी व्याखानाच्या थाटात ‘मला खात्री आहे आणि आपणही विश्वास बाळगा की हिंदुस्तानला स्वराज्य मिळाल्याखेरीज तरणोपाय नाही. ‘आपण व जनता यांनी जे परिश्रम केले त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो.’ कोणीतरी त्यांच्यापुढे श्रीकृष्णाचे चित्र धरले. बराच वेळ निरखून पाहिल्यावर त्यांनी हात जोडले व ‘ यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत। अभ्युत्यानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ‘ हा श्लोक म्हटला आणि डोळे मिटले.पुढे पुढे त्यांचे बोलणे अस्पष्ट होऊ लागले. सरदारगृहासमोरील रस्ता माणसांनी रात्रंदिवस फुललेला असे. चिंतामग्न लोक आशा निराशेच्या हिंदोळ्यावर होते. ३० जुलै रोजी गांधीजी त्यांची तब्येत पाहायला आले. ते म्हणाले ,‘टिळकांनी केलेली त्यागाची परिसिमाच या राष्ट्राला दिशादर्शक होईल. ईश्वर त्यांना बरे करो’ परंतु ते व्हायचे नव्हते .

३१ जुलैला रात्री टिळकांची प्रकृती अत्यवस्थ झाली. सगळे सहकारी, नेते चिंताग्रस्त अवस्थेत उभे होते. डॅाक्टर मंडळी आपापसात चर्चा करत होती. शेवटी त्यांच्या पाठीचा मणका फोडून आतून पातळ पदार्थ बाहेर काढला त्यामुळे त्यांना लागलेला घोर कमी झाला तेवढ्याने देखील लोकांना समाधान वाटले. पण ते फार काळ टिकले नाही. डॅाक्टरांनी सर्वांना वस्तुस्थितीची कल्पना दिली. डॅा.नानासाहेब देशमुख, डॅा. भडकमकर, डॅा. वेलकर, डॅा. साठे, डॅा. गोपाळराव देशमुख, डॅा. आठवले, डॅा. एरूळकर यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पण त्यांना यश आले नाही.

या ब्रम्हर्षीचा शेवट पलंगावर होऊ नये म्हणून दर्भाचे उच्चासन उभारले गेले. त्यावर त्यांना बसवले. तयानंतर काही वेळातच (रा. १२ वाजून ४० मी. ) लोकमान्य अनंतात विलीन झाले. दु:खाचा हाहाःकार झाला. ऋषीतुल्य व्यक्तिमत्व या जगतातून निघून गेले. ‘योगेश्वराचा तनुत्याग ‘अशा शब्दात शि. ल. करंदीकरांनी टिळकांच्या मृत्युचे वर्णन केले आहे.

मुक्ता टिळक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]