०शरदकुमार एकबोटे०
महाराष्ट्रीय साहित्य वर्तुळातलं एक ठळक, लक्षवेधक नाव म्हणजे ‘हेमकिरण पत्की’. काव्य, समीक्षा, ललित-वैचारिक लेखन अशा नात्यानं त्यांची साहित्यसेवा आणि तिला लाभलेली तात्विक बैठक, आणि चिंतनशीलता मोठी विलक्षण आहेच. खेरीज जे. कृष्णमूर्ती या जागतिक कीर्तीच्या साहित्यिक, विचारवंतांच्या तत्वज्ञानाचे अभ्यासक म्हणूनही पत्की जाणकारांच्या उत्सुकतेचे विषय ठरतात. खरं तर ‘अभियांत्रिकीची पदवी धारण केलेल्या या तरूणाला वेल्हाळ शब्दांनी कसा लळा लावला?’, या प्रश्नाचा वेध घेणारी एक प्रकट मुलाखत

सोलापूरच्या ‘प्रिसिजन वाचक अभियान’ या साहित्य संस्थेनं नुकतीच आयोजित केली होती. पत्रकार, साहित्यिक, कलावंत रजनीश जोशी आणि प्रा. डॉ. प्रिया निघोजकर या जाणकारांनी त्यांची मुलाखत घेतली. त्यातून हेमकिरण पत्की यांच्या वैचारिक आणि साहित्यबंधातील विविध पैलूंचे पदर सहज उलगडत गेले.आजवर विविध पुरस्कारांचे मानकरी ठरलेल्या हेमकिरण पत्की यांच्या नावावर सुमारे बारा पुस्तकांचा ऐवज आहे. आगामी तीन-चार ग्रंथांची संपदा पुस्तकरूपाने प्रसिद्ध होण्याच्या प्रतीक्षेत आहे. प्रतिभेचा वारसा त्यांना त्यांचे वडील कवी दत्तात्रय पत्की यांच्याकडून मिळाला आहे. हेमकिरण यांचा स्वच्छ, मोकळा आवाज त्यांच्या काव्यगायनाला अनुकूल आहे.

या मुलाखतीदरम्यान त्यांनी केलेलं काव्यगायन रसिक श्रोत्यांना मुग्ध करणारे ठरले.त्यांची ‘कोरा कागद दे रे राम’ ही अभिधा काव्यगुणयुक्त प्रार्थना त्यांची कन्या अमृता पत्की यांनी गायली. त्या सुश्राव्य गायनाला श्रोत्यांनी मनमुराद दाद दिली. संवेदनशील हळव्या काव्यातून ललित लेखनापर्यंतचा तुमचा साहित्यिक प्रवास कसा बहरत गेला, या प्रश्नावर भाष्य करताना हेमकिरण यांनी ‘या खिडकीतून दिसतात’ ही प्रेरक रचना गाऊन सादर केली.‘एकेक आठवण उसवताना, खिडकीचे होते आकाशआकाशाला फुटत जातात, लुकलुकती गाणी.. ’आज आपण संवादालाच पारखं होत आहोत. हरवलेल्या संवेदनांना पुन्हा शब्दांच्या ओंजळीत पकडावे या हेतूने मी ललित लेखनाकडे झुकलो, असे ते म्हणाले.

प्रा. त्र्य़ं. वि. सरदेशमुख आणि हेमकिरण यांच्यातील काव्यसेतूच्या संदर्भात रजनीश जोशी यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पत्की भावनावश, व्याकूळ होत म्हणाले, ‘सरदेशमुख यांच्या काव्यप्रतिभेला तोड नाही.’मी रुद्राक्षांचा लिलाव फुंकून उठलो :माडीवरच्या विळख्यामधल्या विड्यात रंगून पिचलो !या सरदेशमुखांच्या रचनेचा उल्लेख करीत त्यांनी सांगितलं, ‘कवितेतला ‘मी’ आणि रसिकांचा ‘मी’ यात हार्दिक संवाद घडावा लागतो. शब्दांतून सूचित होणारा अर्थ व्यापक होण्यासाठी कवीचा ‘मी’पणा अनुभवात जिरावा लागतो. किंवा गुंतूनही मोकळं राहू देणारी सजगता त्याच्याकडे असावी लागते. समग्र वर्तमानाचं भान असलेला ‘मी’ सरदेशमुख या कवितेत साकारतात. तुकारामांची गाथा बुडवणारा हा ‘मी’ होता. सालोमालो, मंबाजी याच ‘मी’ची रूपं होती.’मी पानिपताची कैक उरकली श्राद्धे! हिरोशिमाच्या ऊरी नाचवित वेताळांचे तांडे! अशा ओळी उद्धृत करीत हेमकिरण आणि रजनीश यांनी त्यांच्या स्मृती जागवल्या.

साहित्यिक विचारवंत जे. कृष्णमूर्ती यांचे तत्वज्ञान आणि त्यांची आशयघन प्रतिभा हा हेमकिरण पत्की यांच्या चिंतनाचा विषय. यासंदर्भात डॉ. प्रिया यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर बोलताना पत्की म्हणाले, ‘ J. Krishnmurti – listening with heart, Exploration in to insight. The Flower is trong in its beauty; as it come, be forgotten set aside or destroyed… Social morality is immorality.. ’आदितत्वांचे स्पष्टीकरण करून त्यांनी राधाकृष्णाचं एक सुंदर उदाहरण दिलं. याप्रसंगी त्यांनी स्वतःच्यात एका गीताचं गायन केलं. त्यांचा स्वर छान लागला. या गायनाला श्रोत्यांनी मनमुराद दाद दिली.‘झाडांत सावल्यांच्या, गाणे मला मिळाले,नादावलो असा की, माझे मला मिळालेहा भाव अंतरीचा की देणगी कळेनाभारावलो असा की माझे मला मिळाले!’हेमकिरण पत्की हे आपल्याच वडिलांचे शिष्य. कवी दत्तात्रय पत्की हे त्यांचे शिक्षक.

या नात्याच्या संदर्भात रजनीश यांनी विचारलेल्या भावनात्मक प्रश्नाचे विवरण करताना पत्कींचा सूर फारच हळवा झाला होता.‘वर्गात मी त्यांचा मुलगा नव्हतो. अन्य विद्यार्थ्यांप्रमाणेच मी एक. एका प्रसंगी इतर मुलांप्रमाणे त्यांनी मलाही शिक्षा केली. त्या वयात मला त्यांचा खूप राग आला होता. मी त्यांच्याशी बोलणंच सोडलं. नंतर त्यांनी माझी समजूत काढली. माझ्या चांगल्या कामबद्दल मला प्रोत्साहनही मिळत असे.’आईविषयी बोलतानाही त्यांचा आवाज हळुवार झाला होता. आईवरील त्यांची कविता ऐकून श्रोतेही गहिवरले. ‘निरोप’ ही रचना याप्रसंगी सादर केली.

‘माझे आता फार दिवस राहिले नाहीत.हा एवढाच पावसाळा…मग काळीज ओल्या स्वरात ती म्हणाली :अधेमधे घराकडं येत जापात्र कोरडं असलं तरी ते चंद्रभागेचं आहेएवढं मनात असू दे…’अखेरच्या चरणात ते लिहितात – ‘पुढंपुढंच निघालेली एसटी, आईचा खिडकीतून बाहेर आलेला हात… जो फूल गळून पडलेल्या देठासारखा, हलत होता झाडासकट.’या रचनेचे त्यांच्या वडिलांनी केलेलं इंग्रजी भाषांतरसुद्धा तेवढेच सरस उतरले आहे. हेमकिरण यांचे परममित्र मीर अफजल दौलताबादकर यांच्या उर्दू कवितांचे भाषांतर पत्की यांनी तेवढेच समरसून मराठीत केलं आहे. त्याचे प्रभावी वाचन यावेळी झाले.हेमकिरण यांचे बाबा उत्तम कवी होते. त्यांचा मुलगा रेणुप्रसाद हाही असाच शैलीसंपन्न रचनाकार आहे. या सृजनाच्या तीन वाटेवरून चालणाऱ्या तीन पिढ्या – याशिवाय रेणुप्रसाद हा जर्मन भाषेचा अभ्यासक, अनुवादक आहे. याविषयी श्रोत्यांना काय सांगाल, या डॉ. प्रिया यांच्या प्रश्नाचं उत्तर देताना हेमकिरण यांनी ‘उन्हे झेलता झेलता’ ही गेय रचना सादर केली. त्यांनी संथ लयीत म्हटलेल्या कवितेत सारे स्पष्ट झाले.‘उन्हे झेलता झेलता झालो लहानाचा मोठामेघ पेलता पेलता झालो लहानाचा मोठाअसे भोगले दिवस, अशा जागवल्या रातीअशा निरांजनी वाती, वात चेतता चेतताझालो लहानाचा मोठा…’या गझलसदृश रचनेनं श्रोत्यांना अंतर्मुख केलं. या साहित्यप्रधान, चिंतनशील मुलाखतीनं प्रेक्षक भारावून गेले होते. गायन, अभिवाचन आणि आठवणींचा सुरम्य पट उलगडणारी ही मुलाखत सोलापूरकरांना बेहद्द आवडून गेली, यात शंका नाही.-
शरदकुमार एकबोटे, सोलापूर





