*मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या पुतळ्याला जोडे मारून निषेध*
लातूर (प्रतिनिधी):केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कथित मनमानी, पक्षपाती आणि हुकूमशाही कारभाराविरोधात लातूर जिल्हा काँग्रेस कमिटी व लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे तीव्र निदर्शने करण्यात आली.

लातूरचे खासदार डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रमुख उपस्थितीत तर जिल्हाध्यक्ष अभय साळुंके व शहर जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ.शिवाजी जवळगेकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या आंदोलनात काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगासह केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत संपूर्ण परिसर दणाणून सोडला.
पुतळा उलटा टांगून आणि जोडे मारून संताप:

या आंदोलनादरम्यान संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या पुतळ्याला उलटा टांगून त्यावर तीव्र रोष व्यक्त केला, तसेच ज्ञानेश कुमार यांच्या प्रतिमेला आणि पुतळ्याला जोडे मारून संताप व्यक्त केला. आंदोलनाच्या मुख्य मंचावर ‘व्होट चोरी विरोधात जनतेचा एल्गार – देशद्रोही ज्ञानेश कुमार हटावो, लोकशाही बचाओ’ अशा आशयाचे मोठे फलक लावण्यात आले होते.

कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडत “व्होट चोर – गद्दी छोड”, अशा घोषणा दिल्या, ज्यामुळे चौकातील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती.आंदोलनाला संबोधित करताना खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनी यावेळी आंदोलनाला संबोधित करताना देशातील स्वायत्त संस्थांची स्वायत्तता मोडीत काढून लोकशाही व्यवस्थेचा गळा घोटण्याचे काम सध्या सुरू असून निवडणूक आयोगासारख्या अत्यंत महत्त्वाच्या आणि निष्पक्ष असाव्या लागणाऱ्या संस्था सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करायला लावले जात आहे, ही अत्यंत लाजीरवाणी आणि संविधानावर थेट घाला घालणारी बाब आहे, असे ते म्हणाले.मतदार याद्यांमधून लाखो पात्र मतदारांची नावे जाणीवपूर्वक वगळली जात असून मतदारांच्या पवित्र अधिकारारांवर दरोडा टाकला जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या संविधानाचे आणि नागरिकांना बहाल केलेल्या मतदानाच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता रस्त्यावर उतरून शेवटच्या श्वासापर्यंत लढा देईल, असा इशारा त्यांनी दिला.लोकशाही व जनतेचा कौल वाचवण्यासाठी संपूर्ण विरोधी पक्ष व जनता राहुल गांधी यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी असून हा लढा संसदेपासून ते गल्लीबोळापर्यंत अधिक तीव्र केला जाईल, असा ठाम निर्धारही खासदारांनी आपल्या भाषणात व्यक्त केला.

जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांच्याकडून अत्यंत आक्रमक पद्धतीने आयोगाच्या कारभाराची पोलखोल:लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अभय साळुंके यांनी आपल्या आक्रमक शैलीत आंदोलनाला संबोधित केले, यावेळी बोलताना ते म्हणाले की देशात अतिशय पद्धतशीर आणि पूर्वनियोजित (प्री-प्लॅन) व्होट चोरी सुरू आहे. घटनेनुसार राष्ट्रपती, राज्यपाल, सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना केवळ ते पदावर असेपर्यंतच कायदेशीर संरक्षणाची मुभा असते; मात्र २०२३ मध्ये केंद्र सरकारने नवीन कायदा करून निवडणूक आयुक्तांना निवृत्तीनंतरही कोणत्याही कारवाईपासून संरक्षण बहाल केले आहे. असे संरक्षण देऊन त्यांच्याकडून चुकीचे व बेकायदेशीर कामकाज करवून घेतले जात असल्याचा थेट आरोप त्यांनी केला. गेल्या दहा महिन्यांच्या काळात आयोगाच्या बैठकांची कोणतीही विषयपत्रिका (अजेंडा) किंवा इतिवृत्त न ठेवता ज्ञानेश कुमार यांनी एकतर्फी निर्णय लादले आहेत.महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अवघ्या पाच महिन्यांत तब्बल ३९ लाख मतदार संशयास्पदरीत्या वाढवण्यात आले, ज्याविरोधात राहुल गांधी यांनी वेळोवेळी पुराव्यानिशी आवाज उठवला आहे. ‘द इंडियन एक्सप्रेस’च्या पत्रकार ऋतिका चोप्रा यांनी समोर आणलेल्या माहितीनुसार, आयोगातील इतर दोन निवडणूक आयुक्तांनी (सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी) किमान १४ वेळा नोटिंग व ईमेलद्वारे ज्ञानेश कुमार यांच्या एकतर्फी निर्णयांवर गंभीर आक्षेप नोंदवले होते. यावरून निवडणूक आयुक्तांची ही संपूर्ण मिलीभगत उघडी पडली आहे. रेल्वे प्रवाशांना गुंगीचे औषध देऊन चोरी करणाऱ्या टोळ्यांप्रमाणेच मतदारांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप करत, देशातील लोकशाही व मतदानाचा अधिकार धोक्यात आणणाऱ्या मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.
या आंदोलनात विविध पदाधिकाऱ्यांनी निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आपली भूमिका मांडत त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी, अशी मागणी केली.शहर जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. शिवाजी जवळेकर यांचा इशारा:आंदोलनाच्या शेवटी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रा. डॉ. शिवाजी जवळेकर यांनी निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या या संपूर्ण बेकायदेशीर कृत्याचा निषेध करत उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. तसेच, आगामी काळात ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा दिला नाही आणि त्यांच्यावर कारवाई झाली नाही, तर हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
यावेळी महापौर जयश्री सोनकांबळे, प्रदेश सचिव ॲड. समद पटेल,विद्याताई पाटील,डॉ. दिनेश नवगिरे, एन आर पाटील, सचिन बंडापल्ले, विजयकुमार साबदे, जिल्हा उपाध्यक्ष गंगासिंह कदम, प्रभाकर बंडगर, गोविंद बोराडे, मारुती पांडे, विलास पाटील चाकूरकर, दत्तोपंत सूर्यवंशी, जि प सदस्य दत्ता टेकाळे, शिवानंद पाटील, शीलाताई पाटील, सुनिता आरळीकर, सईताई गोरे, सोनाली थोरमोटे, डॉ.अंजुम कादरी, योगिता जाधव, सुभाष जाधव, प्रमोद मरुरे, दिपाली आदमाने, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष निलेश देशमुख,शहराध्यक्ष विष्णुदास धायगुडे, एन.एस.यू.आय.जिल्हाध्यक्ष रोहित बिरादार, सेवादल जिल्हाध्यक्ष अनिल चव्हाण, विजयकुमार पाटील,सचिन पाटील,अजित माने,पंकज शेळके,विजयकुमार पाटील,चंद्रकांत मद्दै,सुधाकर पाटील, आबासाहेब पाटील उजेडकर,गोपाळ भंडे,प्रमोद कापसे,उमेश बेद्रे,संतोष बिरादार,किरण बाबळसुरे नगरसेविक इस्रार सगरे, अहमद खान पठाण, तबसूम शेख,श्रावणी झिपरे, पवन सोलंकर, डॉ.बालाजी साळुंखे, सतीश साळुंखे, मनोज थोरात, गिरीश ब्याळे, संजय ओहळ,असलम शेख,प्रा. प्रवीण कांबळे, राम स्वामी, एड देविदास बोरुळे, आयुब मणियार, वैजनाथ लूल्ले,अकबर माडजे, राम भंडारे अनिल पाटील, संजय पाटील खंडापूरकर, बालाजी वळसांगवीकर,प्रा.सुधीर अनवले, मतीन सय्यद, पवन गायकवाड यांच्यासह जिल्हा कार्यकारिणी, विविध फ्रंटल ऑर्गनायझेशन चे अध्यक्ष व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, सहकारी संस्थांचे पदाधिकारी, नगरसेवक, जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .




