कर्जमाफी-वीजबिल माफीचा संदेश थेट बांधावर; सुनील राणे, अभिमन्यू पवार, बसवराज पाटील यांच्या उपस्थितीत शेतकरी संवाद मेळावा
तावशीताड व करजगाव येथे शेतकऱ्यांच्या बांधावर संवाद; विविध प्रश्नांवर चर्चा,
लाभार्थी शेतकऱ्यांचा सत्कारकर्जमाफी व वीजबिल माफीचे निर्णय शेतकरीहिताचे;
सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर
सुनील राणे, अभिमन्यू पवार, बसवराज पाटील यांच्या उपस्थितीत शेतकरी संवाद मेळावा
औसा : राज्य सरकारने घेतलेले कर्जमाफी आणि वीजबिल माफीचे ऐतिहासिक निर्णय हे शेतकरीहिताचे असून, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असा सूर औसा तालुक्यातील तावशीताड येथे शेतकरी किरण दिक्षीत याच्या व करजगाव येथे शेतकरी सुभाष जाधव याच्या शेतात दि. ७ ऑगस्ट रोजी आयोजित शेतकरी संवाद मेळाव्यात उमटला.

या मेळाव्यात शेतकऱ्यांच्या विविध समस्या जाणून घेण्यात आल्या, तसेच कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.मेळाव्यास भाजपचे प्रदेश सरचिटणीस सुनील राणे, आमदार अभिमन्यू पवार, विधान परिषदेचे आमदार बसवराज पाटील,मराठवाडा संयोजक नितिन काळे, यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सभापती गंगाबाई कोदळीकर, जिल्हा परिषद सदस्य संदिपान शेळके, उपसभापती अमोल पाटील, बसवराज धाराशिवे, सभापती चंद्रशेखर सोनवणे,किरण उटगे, सुभाष जाधव, सुनील उटगे, भीमाशंकर राचट्टे, अमोल निडवदे, अरविंद कुलकर्णी, रमेश वळके, काकासाहेब मोरे, क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष परीक्षित पवार, शिवरुद्र मुर्गे, रुशाल देशमुख, परमेश्वर धुमाळ, संजय कुलकर्णी, पंचायत समिती सदस्य समाधान काबळे, शिवराज राठोड, मंडळाध्यक्ष रवी चिलमे , विष्णू कोळी, पांडुरंग शिवलीकर, अरुण मुकडे आदी उपस्थित होते.

राज्य सरकारने शेतकरी केंद्रस्थानी ठेवून सातत्याने निर्णय घेतले असून, आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी आणि वीजबिल माफी देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे काम हाती घेतले आहे, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश सरचिटणीस सुनील राणे यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार शेतकऱ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवत आहे. सरकारच्या योजना आणि निर्णय प्रत्येक गावात, प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी पार पाडली पाहिजे. शेतकऱ्यांना योजनांची संपूर्ण माहिती मिळाल्यास त्यांना त्याचा अधिक लाभ घेता येईल.राज्य सरकारने इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी आणि वीजबिल माफी देत शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने राज्याला कर्तव्यदक्ष नेतृत्व लाभले असून, शेतकरीहिताचे हे कार्य अधिक बळकट करण्यासाठी शेतकऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सरकारच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, असे आवाहनही राणे यांनी केले.
यावेळी बोलताना आमदार अभिमन्यू पवार म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांसाठी ४० हजार कोटी रुपयांची कर्जमाफी आणि ४६ लाख शेतकऱ्यांसाठी ४८ हजार कोटी रुपयांची वीजबिल माफी जाहीर करण्यात आली आहे. देशाच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कर्जमाफी असल्याचा दावा त्यांनी केला. शेतकरी हिताचे निर्णय प्रभावीपणे तळागाळापर्यंत पोहोचविण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.आमदार बसवराज पाटील यांनी राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याचे सांगितले. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून, औसा तालुक्यातील विकासाचा अनुशेष भरून काढण्याचे काम आमदार अभिमन्यू पवार यांनी केले आहे. भविष्यात औसा हा विकासाचा आदर्श तालुका म्हणून ओळखला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.यावेळी शेतकऱ्यांनी कर्जमाफी, वीजबिल माफी, पीकविमा, ठिबक सिंचन अनुदान, फार्म आयडी, बियाणे उगवण, सहकारी संस्थांचे प्रश्न, व्याज परतावा, महावितरणची कामे आदी विविध समस्या मांडल्या. ठिबक सिंचनाचे अनुदान वेळेत मिळत नसल्याची तक्रार, बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारींची दखल, फार्म आयडीतील अडचणी सोडविण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन देण्यात आले. ..






