Homeकृषीतंत्रज्ञानाधारित शेतीचा स्वीकार करणे काळाची गरज -दादा लाड

तंत्रज्ञानाधारित शेतीचा स्वीकार करणे काळाची गरज -दादा लाड

*जगाला अन्न पुरविण्याची क्षमता भारतात; तंत्रज्ञानाधारित शेतीचा स्वीकार काळाची गरज*

पद्मश्री डॉ. श्रीरंगदादा लाड; एमआयटीमध्ये भारतीय किसान संघाचा शेतकरी मेळावा

लातूर, दि. २६ – भारत हा केवळ कृषीप्रधान देश नसून जगाच्या अन्नसुरक्षेची जबाबदारी पेलण्याची क्षमता भारतीय शेतकऱ्यांमध्ये आहे. मात्र त्यासाठी शेतीमध्ये संशोधन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि तंत्रशुद्ध शेतीपद्धतीचा स्वीकार करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन पद्मश्री कृषी संशोधक डॉ. श्रीरंगदादा लाड यांनी केले.

भारतीय किसान संघाच्या वतीने अंबाजोगाई रोडवरील विश्वनाथपूरम येथील एमआयटी शिक्षण संस्था संकुलातील संत श्री ज्ञानेश्वर महाराज डोम येथे आयोजित भव्य शेतकरी मेळाव्यात डॉ. श्रीरंगदादा लाड प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष तुकाराम येलाले, विभागीय संघचालक संजय अग्रवाल, एमआयटी समूहाचे विश्वस्त तथा रामेश्वरचे माजी सरपंच तुळशीरामअण्णा कराड, एमआयटी समूहाचे संचालक प्रा. तेजस कराड, महिला विभाग प्रमुख शामलताई हुरदळे आदी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना डॉ. श्रीरंगदादा लाड म्हणाले, शेती ही केवळ व्यवसाय नसून ती आपली संस्कृती आणि जीवनाचा आधार आहे. शेतकऱ्यांनी ‘भारत मातेसाठी काहीतरी करण्याची’ भावना जोपासत शेतीकडे पाहिले पाहिजे. प्रत्येक पिकामध्ये संशोधनाची दृष्टी ठेवून आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास कमी खर्चात अधिक उत्पादन घेणे शक्य आहे. मर्यादित बियाण्यांच्या वापरातूनही तंत्रशुद्ध पद्धतीने विक्रमी उत्पादन मिळू शकते, असा अनुभव त्यांनी यावेळी मांडला.

आपल्या संशोधन प्रवासाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, लहानपणापासून शेतीची आवड असल्याने नावीन्यपूर्ण प्रयोग करण्याची प्रेरणा मिळाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील कार्यकाळात शेती संशोधनाची दिशा मिळाली आणि त्यातून कापूस पिकावरील संशोधनाला सुरुवात झाली. या संशोधनाला विद्यापीठाची मान्यता मिळाल्यानंतर देशासह जगभर त्याचा स्वीकार झाला. आज शेतकऱ्यांचे वाढलेले उत्पादन आणि उत्पन्न हेच आपल्या संशोधनाचे खरे यश असल्याचे त्यांनी नमूद केले.यावेळी डॉ. लाड यांच्या हस्ते लातूर जिल्ह्यातील उपक्रमशील शेतकऱ्यांचा तसेच एमआयटी महाविद्यालयातील विविध स्पर्धांतील विजेत्यांचा गौरव करण्यात आला. प्रत्यक्ष शेती करणाऱ्या युवा प्रतिनिधी वैभवी जितेश चापसी यांची भारतीय किसान महासंघाच्या नव्या जबाबदारीसाठी नियुक्ती जाहीर करण्यात आली.

अध्यक्षीय समारोपात प्रा. तेजस कराड म्हणाले, “शेतकरी सक्षम झाला तर राष्ट्र सक्षम होईल.” शेतीमध्ये आधुनिक विचार, तंत्रज्ञान आणि नवकल्पनांचा स्वीकार करून तरुणांनी मोठ्या प्रमाणावर शेती क्षेत्रात उतरले पाहिजे. शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय किसान संघ राबवत असलेल्या उपक्रमांना एमआयटी समूहाचा कायम सक्रिय पाठिंबा राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने झाली. जिल्हाध्यक्ष तुकाराम येलाले यांनी मेळाव्याच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली, तर विभागीय संघचालक संजय अग्रवाल यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास आराध्ये व परमेश्वर सोनवणे यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. या मेळाव्यास लातूर जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments