आ अभिमन्यू पवार यांच्या पाठपुराव्याला यश ; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची पंढरपूर येथे एकात्मिक सैनिक संकुल उभारणीला मान्यता
महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची पंढरपूर येथे एकात्मिक सैनिक संकुल उभारणीला मान्यता
औसा- पंढरपूर येथे दर्शनासाठी येणाऱ्या माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांसाठी एकात्मिक सैनिक संकुल उभारण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रस्तावाला महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे राज्यासह देशभरातील माजी सैनिकांना मोठा दिलासा मिळणार असून, या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे आमदार अभिमन्यू पवार यांनी समाधान व्यक्त केले आहे.

पंढरपूर हे महाराष्ट्रासह देशभरातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान मानले जाते. गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमधूनही मोठ्या संख्येने माजी सैनिक व त्यांचे कुटुंबीय दरवर्षी श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे येत असतात. विशेषतः आषाढी, कार्तिकी, माघी एकादशी तसेच मासिक वारीच्या काळात लाखो भाविकांसोबत मोठ्या प्रमाणात माजी सैनिकही येथे दाखल होतात.मात्र, या काळात माजी सैनिकांसाठी स्वतंत्र, सुरक्षित आणि सन्मानजनक निवास व्यवस्था उपलब्ध नसल्याने त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. देशसेवेसाठी संपूर्ण आयुष्य समर्पित केलेल्या सैनिकांना दर्शनासाठी येताना निवासाची चिंता भेडसावत असल्याची बाब लक्षात घेऊन आमदार अभिमन्यू पवार यांनी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे पंढरपूर येथे माजी सैनिकांसाठी स्वतंत्र भक्तनिवास उभारण्याची मागणी पत्राद्वारे केली होती.
या मागणीची सैनिक कल्याण विभागाने सकारात्मक दखल घेतली असून आता या प्रकल्पाला प्रत्यक्ष गती मिळणार आहे. विशेष म्हणजे, पंढरपूर येथे प्रस्तावित एकात्मिक सैनिक संकुल उभारणीस महामहिम राज्यपालांनी मंजुरी दिली असून सुमारे ५४.६१ कोटींच्या अंदाजपत्रकालाही मान्यता प्रदान करण्यात आली आहे. आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून हा प्रस्ताव लवकरच शासनाकडे अंतिम मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे.

प्रस्तावित एकात्मिक सैनिक संकुलामध्ये माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी निवास व्यवस्था, भोजन सुविधा, वैद्यकीय सेवा, माहिती केंद्र तसेच इतर आवश्यक सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे पंढरपूर येथे दर्शनासाठी येणाऱ्या हजारो माजी सैनिकांना मोठा आधार मिळणार असून त्यांच्या सन्मानाला साजेशा सुविधा उपलब्ध होतील.हा प्रकल्प माजी सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा आणि त्यांच्या सेवेला योग्य तो सन्मान देणारा ठरणार आहे. हा प्रकल्प लवकरात लवकर प्रत्यक्षात यावा यासाठी पुढील काळातही आमदार अभिमन्यू पवार सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले…..




