आ.अभिमन्यू पवार यांच्या प्रयत्नांना मोठे यश; औशात ‘संत शिरोमणी श्री मारुती महाराज मार्गा’साठी तब्बल ७०० कोटींची मंजुरी
लातूर-औसा-सास्तूर मार्गाचा होणार कायापालट;
AIIB अंतर्गत ७०० कोटींची भव्य मंजुरी
लातूर – आलमला – औसा – नागरसोगा – पोमादेवी जवळगा – गुबाळ ते सास्तूर या राज्य मार्गाच्या रुंदीकरण व सुधारणा कामास मंजुरी
औसा- औसा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा देणारा आणि दळणवळण व्यवस्थेला अभूतपूर्व बळकटी देणारा महत्त्वाकांक्षी रस्ते प्रकल्प अखेर मंजूर झाला आहे.आमदार अभिमन्यू पवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे एशियन इन्फ्रा इन्व्हेस्टमेंट बँक (AIIB) अंतर्गत बार्शी रोड जंक्शन, लातूर ते आलमला, औसा, नागरसोगा, पोमादेवी जवळगा, गुबाळ ते सास्तूर या राज्य मार्गाच्या रुंदीकरण व सुधारणा कामासाठी अंदाजे ७०० कोटी रुपयांची मंजुरी मिळाली आहे.
या निर्णयामुळे औसा मतदारसंघातील ग्रामीण भागाच्या विकासाला मोठी चालना मिळणार असून नागरिकांमध्ये समाधान आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामध्ये दोन प्रमुख मार्गांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये बार्शी रोड जंक्शन, लातूर ते आलमला, औसा, नागरसोगा, पोमादेवी जवळगा, गुबाळ ते सास्तूर हा सुमारे ४० किलोमीटर लांबीचा राज्य मार्ग तसेच हसलगन ते संक्राळ, पोमादेवी जवळगा, चिंचोली तपसे, लामजना ते राष्ट्रीय महामार्ग ५४८(B) हा २० किलोमीटर लांबीचा प्रमुख जिल्हा मार्ग यांचा समावेश आहे. या दोन्ही मार्गांचे आंतरराष्ट्रीय दर्जानुसार रुंदीकरण, मजबुतीकरण आणि आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. प्रकल्पाचा विस्तृत आराखडा तयार करण्यासाठी विस्तृत प्रकल्प अहवाल अर्थात DPR तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून त्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत.

संत शिरोमणी श्री मारुती महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीतून हा मार्ग जात असल्याने या रस्त्याला ‘संत शिरोमणी श्री मारुती महाराज मार्ग’ असे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. धार्मिक, सांस्कृतिक आणि विकासात्मक वारसा जपणाऱ्या या नामकरणामुळे या मार्गाला विशेष ओळख मिळणार आहे. स्थानिक नागरिक आणि भाविकांमध्येही या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.औसा मतदारसंघात यापूर्वीही मोठ्या प्रमाणावर रस्ते विकास प्रकल्प मंजूर करण्यात आले असून अनेक कामे वेगाने सुरू आहेत. आशियाई विकास बँक अर्थसहाय्य रस्ते विकास प्रकल्प टप्पा-३ अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या ४२८ कोटी रुपयांच्या ‘निळकंठेश्वर मार्गा’चे काम सध्या सुमारे ६० टक्के पूर्ण झाले आहे. या मार्गामध्ये आशिव, मातोळा, हसलगन, नांदुर्गा, गुबाळ, मंगरूळ, गांजनखेडा, किल्लारी, सांगवी, जेवरी, सिंगनाळ ते नणंद या ५३ किलोमीटर रस्त्याचा समावेश आहे.

तसेच २५८ कोटी रुपयांच्या ‘महापुरुष मार्गा’चे कामही अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. महात्मा बसवेश्वर महाराज चौक, लातूर ते खोपेगाव, कव्हा, जमालपूर, खुंटेगाव, हासेगाववाडी, जयनगर, आपचुंदा, जावळी ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, लामजना पाटी या ३२ किलोमीटर मार्गाचा या प्रकल्पात समावेश आहे.नव्या रस्ते प्रकल्पामुळे औसा मतदारसंघातील ग्रामीण भाग शहरांशी अधिक वेगाने आणि सुरक्षितपणे जोडला जाणार आहे. शेतकऱ्यांना शेतमाल वाहतुकीसाठी सुलभ सुविधा उपलब्ध होणार असून व्यापारी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांचा प्रवास अधिक जलद आणि सुरक्षित होणार आहे. उद्योग, व्यापार आणि कृषी क्षेत्रालाही या प्रकल्पाचा मोठा फायदा होणार असल्याचे सांगितले जात आहे. विशेषतः सास्तूर, आलमला, नागरसोगा आणि लामजना परिसरातील आर्थिक हालचालींना या रस्तेमार्गामुळे मोठी गती मिळणार आहे.या ऐतिहासिक मंजुरीसाठी आमदार अभिमन्यू पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री सुनित्राताई पवार तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिहराजे भोसले यांचे औसा मतदारसंघातील जनतेच्या वतीने मनःपूर्वक आभार मानले आहेत.औसा मतदारसंघात सलगपणे मंजूर होत असलेले कोट्यवधी रुपयांचे रस्ते प्रकल्प, वेगाने सुरू असलेली विकासकामे आणि वाढती दळणवळण सुविधा यामुळे येत्या काळात औसा मतदारसंघ मराठवाड्यातील महत्त्वाचे विकासकेंद्र म्हणून उदयास येईल, असा विश्वास नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.












