Homeलेखशिक्षक दिन : बदलत्या शिक्षणविश्वात शिक्षकाची बदलती भूमिका

शिक्षक दिन : बदलत्या शिक्षणविश्वात शिक्षकाची बदलती भूमिका

प्रासंगिक

शिक्षक दिन : बदलत्या शिक्षणविश्वात शिक्षकाची बदलती भूमिका

शिक्षक दिन म्हटला की डोळ्यांसमोर येतात ते वर्ग, फळा, खडू, विद्यार्थ्यांचे निरागस चेहरे आणि आयुष्याला दिशा देणाऱ्या शिक्षकांच्या आठवणी. मात्र आज शिक्षक दिनाकडे केवळ शुभेच्छांचा दिवस म्हणून पाहून चालणार नाही. बदलत्या काळात शिक्षकाची भूमिका काय असावी, त्याच्यासमोरची आव्हाने कोणती आहेत आणि विद्यार्थ्यांशी त्याचे नाते कसे असावे, याचा विचार करण्याची ही योग्य वेळ आहे.

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार यंदाचा शिक्षक दिन लातूरकरांसाठी एका विशेष अभिमानाची बातमी घेऊन आला आहे. लातूरच्या पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालयातील गणित शिक्षक वैभव वसंतराव कुलकर्णी यांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली आहे. देशभरातील ४८ शिक्षकांमध्ये महाराष्ट्रातील चार शिक्षकांचा समावेश असून, त्यात लातूरच्या शिक्षकाचे नाव असणे ही संपूर्ण शहरासाठी निश्चितच अभिमानाची बाब आहे. एका शिक्षकाच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली जाणे म्हणजे त्या शिक्षकाचा सन्मान तर आहेच; पण लातूरच्या शिक्षणविश्वाचाही गौरव आहे.

यावर्षी 30000 नवीन शिक्षकांची भरती दुसरीकडे, शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या शिक्षणविश्वात सर्वाधिक चर्चेचा विषय आहे तो तीस हजार शिक्षक पदांच्या भरतीचा. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या भरतीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था, विविध शासकीय यंत्रणा आणि खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील पदांचा समावेश आहे. उपलब्ध माहितीनुसार, एकूण ३०,२०९ पदांपैकी १९,८८१ पदे मुलाखतीशिवाय, तर १०,३२८ पदे मुलाखतीच्या माध्यमातून भरण्याची तरतूद आहे. एका बाजूला शिक्षक होण्याची संधी मिळण्यासाठी हजारो उमेदवार प्रयत्नशील आहेत, तर दुसऱ्या बाजूला वर्गात शिकवत असलेला शिक्षक नव्या पिढीला समजून घेण्याचे आव्हान पेलत आहे. कारण आजचा विद्यार्थी पूर्वीचा विद्यार्थी राहिलेला नाही ! ‘शिक्षक’ नव्हे, तर ‘मार्गदर्शक’ होण्याची गरजआजच्या Gen Z विद्यार्थ्याकडे माहिती मिळविण्याचे असंख्य स्रोत आहेत. इंटरनेट, सोशल मीडिया, डिजिटल साधने आणि आता कृत्रिम बुद्धिमत्ता यामुळे माहिती मिळवण्यासाठी शिक्षक हा एकमेव स्रोत राहिलेला नाही. पण म्हणून शिक्षकाचे महत्त्व कमी झाले आहे का? अजिबात नाही. उलट शिक्षकाची भूमिका अधिक व्यापक आणि अधिक जबाबदारीची झाली आहे. पूर्वी शिक्षक माहिती देत असे. आता इंटरनेट, सोशल मीडियावरून योग्य माहिती निवडायला, तिची सत्यता तपासायला आणि तिचा अर्थ समजून घ्यायला विद्यार्थ्याला शिकवणे ही शिक्षकाची जबाबदारी आहे.आजच्या विद्यार्थ्यांना सतत सूचना देण्यापेक्षा त्यांच्याशी संवाद साधणे अधिक परिणामकारक ठरते. ‘माझ्या काळात असे नव्हते’ या भूमिकेतून आजच्या विद्यार्थ्यांकडे पाहण्यापेक्षा ‘तुमचा काळ मला समजून घ्यायचा आहे’ अशी भूमिका शिक्षकाने स्वीकारली पाहिजे. प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्याला विरोधक न समजता त्याच्या प्रश्नामागची जिज्ञासा समजून घेतली पाहिजे.वर्गात चर्चा, प्रयोग, प्रकल्प आणि वास्तविक जीवनाशी जोडलेली उदाहरणे वाढली पाहिजेत. तंत्रज्ञानाचा विरोध करण्यापेक्षा त्याचा विवेकपूर्ण वापर शिकवला पाहिजे. कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यार्थ्यांसाठी तयार उत्तर मिळवण्याचे साधन न बनता विचार करण्याचे साधन कसे ठरू शकते, हे शिक्षकांनी दाखवून दिले पाहिजे.शिस्त हवी; पण भीती नकोपूर्वी ‘छडी लागे छम छम, विद्या येई घम घम’ असे म्हटले जायचे. काळ बदलला आणि अशा शिक्षेवर कायदेशीर बंधने आली.

खरे तर शिक्षेची गरजच का भासते, हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. शिक्षकाचा संयम सुटतो तेव्हा शिक्षा केली जाते; पण एका छोट्या चुकीच्या प्रतिक्रियेतून मोठे गैरसमज आणि कधी कधी गंभीर प्रसंग निर्माण होऊ शकतात. त्यामुळे शिक्षेपेक्षा समुपदेशन, संवाद आणि समजावून सांगणे अधिक महत्त्वाचे आहे.शिस्त आवश्यक आहे; मात्र आजच्या विद्यार्थ्यांसाठी शिस्त म्हणजे केवळ भीती नव्हे. अधिकार वापरताना संवेदनशीलता आणि चूक दाखवताना विद्यार्थ्याच्या स्वाभिमानाची जपणूक—हीच आधुनिक शिक्षकाची खरी कसोटी आहे. विद्यार्थ्यांशी सुरक्षित आणि सन्मानजनक वर्तन हीदेखील तितकीच महत्त्वाची बाब आहे. शिक्षकाने स्वतःलाही जपले पाहिजे ! बदलत्या शिक्षणव्यवस्थेची चर्चा करताना शिक्षकाच्या मानसिक स्वास्थ्याचा मुद्दा अनेकदा दुर्लक्षित राहतो. विशेषतः खासगी शाळांमधील शिक्षकांनी प्रत्येक काम परिपूर्ण करण्याच्या आणि एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या पार पाडण्याच्या प्रयत्नात स्वतःला सतत थकवून घेणे टाळले पाहिजे.सध्या शासन आणि संपूर्ण जग Gen Z पिढीला समजून घेताना अनेक प्रश्नांना सामोरे जात आहे. आणि आपण शिक्षक? आपण तर त्याच्या पुढची Gen Alpha पिढी सांभाळत आहोत. त्यामुळे ताण तर येणारच !पण प्रत्येक गोष्टीची चिंता करण्याची गरज नाही. शिक्षकांनी संपूर्ण जगाची चिंता करण्यापेक्षा आपल्या हातात असलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. ज्या गोष्टीवर आपला अधिकार नाही, त्याची सतत फिकीर करून स्वतःला थकवण्याचे कारण नाही. शिक्षकांनी आपली चाळीस मिनिटांची वर्गातील शिकवणी चांगली कशी होईल, याकडे लक्ष द्या. वेळेत शाळेत या, वेळेत घरी जा. परीक्षेचे पेपर वेळेत द्या. निकाल वेळेत लावा. पालकांशी सौजन्याने वागा. विद्यार्थ्यांच्या चांगल्या कामाचे कौतुक करा. त्यांना सकारात्मक अभिप्राय द्या. शालेय प्रशासनाने घेतलेल्या निर्णयावर ‘पण?’ आणि ‘का?’हे दोन प्रश्न टाळले तर आपले काम खूप सोपे होईल. कदाचित सध्या शिक्षकांकडून अपेक्षित असलेले ‘अधिक’ इतकेच आहे. त्यामुळे ते प्रामाणिकपणे आणि आनंदाने करण्याचा प्रयत्न करूया. मित्र, पालक आणि मार्गदर्शकाची भूमिका आज अनेक पालकांकडे मुलांना चांगल्या सुविधा देण्यासाठी पैसा आहे; मात्र त्यांच्यासोबत घालवण्यासाठी पुरेसा वेळ नाही. शाळा आणि क्लासेसच्या व्यापामुळे मुले दिवसातील सात-आठ तास शिक्षकांसोबत असतात. पालकांना मुलांसोबत मिळणारा वेळ तुलनेने कमी होत चालला आहे.अशा परिस्थितीत शिक्षकाची जबाबदारी केवळ अभ्यासक्रम पूर्ण करण्यापुरती मर्यादित राहत नाही. विद्यार्थ्याशी दोन मिनिटे मनापासून बोलणे, त्याचे म्हणणे ऐकून घेणे, त्याच्या छोट्याशा यशाचे कौतुक करणे आणि अडचणीच्या वेळी योग्य दिशा दाखवणे—कधी कधी या गोष्टी एखाद्या धड्यापेक्षाही जास्त परिणाम घडवतात.

आजचा शिक्षक विद्यार्थ्याचा शिक्षक तर आहेच; अनेकदा तो त्याचा मार्गदर्शक, समुपदेशक आणि विश्वासाचा माणूसही आहे. शेवटी शाळेची इमारत कितीही भव्य असो, तंत्रज्ञान कितीही आधुनिक असो, स्मार्ट बोर्ड कितीही मोठा असो किंवा अभ्यासक्रम कितीही आकर्षक असो—विद्यार्थ्याच्या आयुष्यात खरा बदल घडवून आणणारा घटक आजही ‘शिक्षक’च आहे.सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!–

लेखन: दर्शन राजकुमार देशपांडे, लातूर darshandeshpande844@gmail.com

(लेखक हे लक्ष्मीरमण लाहोटी सीबीएससी इंग्लिश स्कूल लातूर.येथे सहशिक्षक आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments