दुष्काळ कायमचा पुसण्यासाठी औसा मतदारसंघात जलसंधारणाची लोकचळवळ उभारणार – आ अभिमन्यू पवार
जलसमृद्ध औसा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात करजगाव येथे आ अभिमन्यू पवारांनी साधला शेतकऱ्यांशी संवाद
औसा : लातूर, धाराशिव आणि बीड या जिल्ह्यांना दर दोन ते चार वर्षांनी दुष्काळाचा सामना करावा लागतो. औसा तालुक्यातील तेरणा नदीकाठच्या काही गावांचा अपवाद वगळता सुमारे ७० ते ७३ गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या निर्माण होते. या परिस्थितीवर केवळ तात्पुरत्या उपाययोजनांनी मात करता येणार नाही. त्यामुळे पावसाचा प्रत्येक थेंब गावातच अडवून जमिनीत जिरवणे, भूजल पातळी वाढवणे आणि लोकसहभागातून जलसंधारणाची कामे राबवणे आवश्यक आहे. यासाठी ‘जलसमृद्ध औसा अभियान’च्या दुसऱ्या टप्प्यात संपूर्ण मतदारसंघात जलसंधारणाची कामे व्यापक प्रमाणावर राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती आमदार अभिमन्यू पवार यांनी दिली.
जलसमृद्ध औसा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत जलसंधारणाच्या कामांना लोकचळवळीचे स्वरूप देण्यासाठी करजगाव येथे दि. १५ ऑक्टोबर रोजी आयोजित शेतकरी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी शेतकरी बांधवांशी संवाद साधत दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी जलसंधारणाचे महत्त्व स्पष्ट केले.औसा तालुक्यात पाणीटंचाईची समस्या गंभीर आहे. अनेक गावांमध्ये दरवर्षी पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागते. ही परिस्थिती बदलण्यासाठी काही महिन्यांपूर्वी जलसमृद्ध औसा अभियानांतर्गत मतदारसंघातील पाच गावांची एकात्मिक विकासासाठी निवड करण्यात आली. महाराष्ट्र शासन, क्रिएटिव्ह फाउंडेशन यांच्या माध्यमातून या गावांमध्ये जलसंधारणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. या अंतर्गत नाल्यांचे खोलीकरण आणि सरळीकरण करण्यात येत असून, त्याचा भविष्यात पाणी साठवण व भूजल पातळी वाढविण्यासाठी फायदा होणार आहे. जलसंधारणाच्या कामांसाठी सकारात्मक भूमिका घेणाऱ्या आणि लोकसहभागातून कामे करण्यास तयार असलेल्या गावांना प्राधान्य दिले जाणार आहे. गावात पडणारे पावसाचे पाणी गावातच अडवून जमिनीत मुरविणे, विहिरी व बोअरवेलचे पुनर्भरण करणे, तसेच गाव परिसरातील जुने तलाव आणि नाल्यांचे खोलीकरण करणे, यावर भर देण्यात येणार आहे.

औसा मतदारसंघाला जलसंकटातून जलसमृद्धीकडे नेण्यासाठी योजनेंतर्गत कृतीशील आराखडा तयार करण्यात आला आहे. या अंतर्गत मतदारसंघातील प्रत्येक गावात जलतारा, विहीर पुनर्भरण, बोअरवेल पुनर्भरण, शेततळे, नाला खोलीकरण, रिचार्ज शाफ्ट, सीएनबी आणि गॅबियन बंधारा अशा आठ प्रकारच्या जलसंधारणाच्या कामांना चालना देण्यात येणार आहे.या कामांमुळे पावसाचे पाणी अडविण्यासोबतच भूजल पातळीत वाढ होण्यास मदत होईल. तसेच दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतात जलसंधारणाची कामे करून रोजगार मिळविण्याची संधी उपलब्ध होईल. शासनाच्या योजनांच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे आणि रोजगारनिर्मिती यांची सांगड घालणे, हा या अभियानाचा प्रमुख उद्देश असल्याचे आमदार पवार यांनी सांगितले.
यंदाचा दुष्काळ अधिक तीव्र असून, डिसेंबरनंतर पाणीटंचाईची तीव्रता आणखी जाणवू शकते. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. शासनाकडून चारा उपलब्धता, विविध पाणीपुरवठा योजनांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था, तसेच अनुदान व पीकविम्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत करण्याचे प्रयत्न केले जातील. जलसंधारणाच्या कामांमधून रोजगारही उपलब्ध करून दिला जाणार आहे. मात्र, दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी प्रत्येकाने सामाजिक जबाबदारी म्हणून पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.शेतीमध्ये पाटाने पाणी देण्याऐवजी ठिबक सिंचनाचा वापर केल्यास पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाणी बचतीच्या उपाययोजना स्वीकाराव्यात. शासन, प्रशासन आणि शेतकरी यांनी एकत्रित प्रयत्न केल्यास औसा मतदारसंघाला दुष्काळाच्या संकटातून बाहेर काढून जलसमृद्धीकडे नेणे शक्य होईल, असा विश्वासही आमदार पवार यांनी व्यक्त केला.यावेळी संतोष मुक्ता, सुभाषराव जाधव, अॅड. श्रीधर जाधव, सदाशिव जोगदंड, सुनीता सूर्यवंशी, भालचंद्र पाटील, विलास काळे आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.





