दिवंगत लोकेनेते विलासराव देशमुख यांच्या १४ व्या स्मृतिदिनानिमित्त
पोद्दार हॉस्पिटलमध्ये आयोजित मोफत अस्थिरोग शिबिरात १७३ रुग्णांची तपासणी

लातूर ( माध्यम वृत्तसेवा ): दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख यांच्या १४ व्या स्मृतिदिनानिमित्त येथील पोद्दार हॉस्पिटलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मोफत अस्थिरोग तपासणी व उपचार शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात एकूण १७३ रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. मनपा आयुक्त राहुल कुलकर्णी यांनी या शिबिरास भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले.
या शिबिराचे च्या उदघाटन मनपा अतिरिक्त आयुक्त देविदास जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी युवा नेते अभिजित देशमुख, लातूर शहर मनपाचे उपमहापौर एड. स्नेहल उटगे, स्थायी समितीचे सभापती सचिन बंडापल्ले, नगरसेवक किरण जाधव, अभिषेक पतंगे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके, शहर जिल्हाध्यक्ष प्रा. शिवाजी जवळगेकर, डॉ. विश्रांत भारती रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनचे अध्यक्ष रमेश चिल्ले, प्रोजेक्ट चेअरमन निलेश सोनी, अकबर माडजे , शशिकांत मोरलावार , अजय दुडिले, विजय पस्तापुरे , शिरीष उटगे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्प अर्पण करण्यात येऊन दीप प्रज्वलनाने शिबिराचे उदघाटन झाले.

पोद्दार हॉस्पिटलच्या वतीने आयोजित केले गेलेले आजचे हे १७५ वे मोफत अस्थिरोग शिबीर होते . विलासराव देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षीप्रमाणे यावर्षीही लातूर शहर व जिल्हाभरातील एकूण ३०० हुन अधिक हॉस्पिटल्समध्ये १२ ते १४ हजार रुग्णांची मोफत तपासणी व उपचार करण्यात आले. यामध्ये आयएमए, आयडीए, निमा, होमिओ,आयुर्वेद अशा विविध संघटनांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. आपल्या दिवंगत लोकनेत्याप्रती असलेली श्रद्धा व प्रेम या रुग्णसेवेच्या उपक्रमातून वैद्यकीय क्षेत्रातील सर्व तज्ज्ञ मंडळी दाखवून देण्याचे काम करतात. कोणत्याही नेत्याला आपल्यातून जाऊन एवढा प्रदीर्घ उलटूनही आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून आगळीवेगळी श्रद्धांजली आणि अभिवादन करण्याचे काम राज्यात अन्यत्र कोठेही आढळून येत नाही. लातूर जिल्ह्यातील तज्ज्ञ डॉक्टर्स संघटनांच्या वतीने आरोग्यसेवेचा हा यज्ञ अव्याहतपणे सुरु आहे, हे विशेष.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ.अशोक पोद्दार यांच्या पुढाकाराने सुरु करण्यात आलेल्या या आरोग्य शिबीर संकल्पनेचे कौतुक आणि स्वागत केले. दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख यांना आपल्यातून जाऊन आता १४ वर्षांचा कालावधी उलटला आहे. त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनापासून सुरु झालेला रुग्णसेवेचा हा यज्ञ यावर्षी सलग १३ व्या वर्षीही सलगपणे सुरु आहे. लातूर शहर मनपाचे आयुक्त राहुल कुलकर्णी यांनी या शिबिरास भेट देऊन आपल्या शुभेच्छा दिल्या. आपल्या मनोगतात त्यांनी डॉ.अशोक पोद्दार यांच्या वैद्यकीय सेवा आणि सामाजिक कार्यातील सहभागाबद्दल आपण ऐकून होतो, त्याची आज प्रत्यक्ष प्रचिती आल्याचे मत व्यक्त केले. आपल्या लोकनेत्याप्रती लातूरकरांतून व्यक्त होणारा हा सेवाभाव खरोखर सर्वासाठी प्रेरणादायी असल्याचे मतही आयक्त कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोद्दार हॉस्पिटलचे संचालक व ख्यातनाम अस्थिशल्य चिकित्सक डॉ. अशोक पोद्दार यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी आपल्या दिवंगत लोकनेत्याच्या स्मृतीप्रित्यर्थ आपल्या हॉस्पिटलच्या वतीने दरवर्षी मोफत अस्थिरोग शिबीर आयोजित केले जाते. तसेच या दिवशी दिवसभर हॉस्पिटलमध्ये विलासराव देशमुख यांच्या गाजलेल्या व्हिडीओ फिती दाखवण्यात येतात. शिबिरात सहभागी झलेल्या रूग्णांना मोफत तसेच काही सुविधा सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिल्या जात असल्याचेही त्यांनी सांगितले. या उपक्रमात सर्वच वैद्यकीय संघटनांच्या पदाधिकारी व तज्ज्ञ डॉक्टरांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला असल्याचेही डॉ. पोद्दार यांनी सांगितले.

या शिबिरात एकूण १७३ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये सर्वच्या सर्व १७३ रुग्णांची हाडांच्या ठिसूळतेची तपासणी करण्यात आली. तसेच सर्व रुग्णांना मोफत औषधी देण्यात अली. ८२ रुग्णांचे एक्सरे काढण्यात आले. ६७ रुग्णाची लॅब टेस्ट, १०३ रुग्णांची शुगर तपासणी तर ७७ रुग्णांची व्हिटॅमिन डी – ३ तपासणी करण्यात आली. शिबिरात सहभागी झालेल्या रुग्णाची तपासणी डॉ. अशोक पोद्दार यांच्यासह डॉ. इमरान कुरेशी, डॉ. पल्लवी जाधव, डॉ. फिरदोस शेख, डॉ. सिद्रामप्पा भोसगे यांनी केली. शिबिराच्या यशस्वीतेसाठी हॉस्पिटलचे व्यवस्थापक वसीम शेख यांच्यासह हॉस्पिटलच्या सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
—————————————————-





