Homeजनसंपर्क'वसंतराव दत्तवाडे मर्यादित साधनांतून अमर्याद पत्रकारितेचा आदर्श '

‘वसंतराव दत्तवाडे मर्यादित साधनांतून अमर्याद पत्रकारितेचा आदर्श ‘

वसंतराव दत्तवाडे यांच्याकडून मर्यादित साधनांतून अमर्याद पत्रकारितेचा आदर्श – प्रसाद कुलकर्णी

शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात बोलताना प्रसाद कुलकर्णी

कोल्हापूर, दि. २७ मर्यादित भांडवल, मर्यादित साधनसामग्री आणि मर्यादित कार्यक्षेत्र असूनही ‘दै. महासत्ता’चे दिवंगत संपादक वसंतराव दत्तवाडे यांनी चार दशकांहून अधिक काळ पत्रकारितेत अमर्याद काम उभे केले. नेहरूंच्या राष्ट्रनिर्मितीच्या आदर्शाला अनुसरून माणूस घडविणे, पत्रकारितेची नैतिकता जपणे आणि नव्या पिढीला घडविणे, हे त्यांच्या कार्याचे मोठे वैशिष्ट्य राहिले, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्रसाद कुलकर्णी यांनी आज येथे केले.

दत्तवाडे यांच्या पत्रकारितेवर सखोल संशोधन व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.ज्येष्ठ संपादक वसंतराव दत्तवाडे यांचे नुकतेच निधन झाले. शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री (कै.) डॉ. ग.गो. जाधव पत्रकारिता अध्यासनात आज दत्तवाडे यांच्याविषयी श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून श्री. कुलकर्णी बोलत होते.वसंतराव दत्तवाडे यांच्या पत्रकारितेचा कुलकर्णी यांनी व्यापक आढावा घेतला. ते म्हणाले, इचलकरंजीसारख्या औद्योगिक नगरीत दैनिक सुरू करणे ही मोठी जोखीम होती; मात्र दत्तवाडे यांनी ती जाणीवपूर्वक स्वीकारली. केवळ वृत्तपत्र चालवणे हा त्यांचा उद्देश नव्हता, तर त्यातून परिसरातील सामाजिक, औद्योगिक आणि सांस्कृतिक जीवनाला दिशा देणे, हे त्यांचे ध्येय होते. स्वातंत्र्यानंतर घडत गेलेल्या नव्या भारताच्या उभारणीच्या प्रक्रियेत दत्तवाडे यांची पत्रकारिता नेहरूंच्या राष्ट्रनिर्मितीच्या विचारांशी नाते सांगणारी होती. नवा भारत घडविण्याचा नेहरूंचा आदर्श त्यांनी आपल्या पत्रकारितेतून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे पुढे नेला. बातम्यांपुरते मर्यादित न राहता समाजातील नव्या मूल्यांची जडणघडण करणे, हा त्यांच्या पत्रकारितेचा गाभा होता.

दत्तवाडे यांच्या पत्रकारितेचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे पत्रकारितेची नैतिकता असल्याचे सांगून कुलकर्णी म्हणाले, मोठ्या भांडवली वृत्तपत्रांच्या स्पर्धेत न पडता, त्यांनी स्वतंत्र स्थान निर्माण केले. संपादकीय व्यापकता, प्रामाणिक भूमिका आणि वाचकांशी जिव्हाळ्याचे नाते यामुळे आपला विश्वासार्ह वाचकवर्ग निर्माण केला. स्थानिक प्रश्नांसह राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय घडामोडींवरही त्यांनी समतोल मांडणी केली. दत्तवाडे यांचे वैशिष्ट्य म्हणजे माणसे ओळखणे, घडवणे आणि त्यांना पुढे जाण्यासाठी पाठबळ देणे. अनेक पत्रकार त्यांच्या हाताखाली घडले, तिथून मोठ्या माध्यमांत गेले आणि संपादक म्हणून नावारूपाला आले. नवोदितांना जबाबदाऱ्या देणे, त्यांच्या लिखाणातील चमक ओळखणे आणि त्यांच्यात संपादकीय संस्कार रुजवणे, ही दत्तवाडे यांची खासियत असल्याचेही त्यांनी सांगितले.

लेखकांना लिहिते ठेवणे, विविध विषयांवरील पुरवण्या चालवणे आणि स्थानिक तसेच व्यापक विषयांना जागा देणे, यात त्यांची दृष्टी ठळकपणे दिसते, असेही त्यांनी नमूद केले.इचलकरंजी आणि परिसरातील सामाजिक शांतता, औद्योगिक समन्वय आणि सांस्कृतिक समृद्धी टिकविण्यात दत्तवाडे यांनी दिलेले योगदानही कुलकर्णी यांनी अधोरेखित केले. जात, धर्म, पक्षीय विचारसरणी यांच्या पलीकडे जाऊन समाजात व्यापक समन्वय टिकविण्याची त्यांची भूमिका महत्त्वाची होती, असे कुलकर्णी म्हणाले. त्यामुळे त्यांचे वृत्तपत्र परिसरातील सामाजिक जाणीवेचे महत्त्वाचे माध्यम बनले. वसंतराव दत्तवाडे यांच्या संपूर्ण पत्रकारितेवर सखोल संशोधन होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या सुरवातीला वसंतराव दत्तवाडे यांना दोन मिनिटे मौन बाळगून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी किसनराव कुराडे, डॉ. आलोक जत्राटकर, दयानंद लिपारे, प्रमोद व्हनगुत्ते, प्रा. सुनील देसाई यांनी श्रद्धांजलीपर मनोगते व्यक्त केली. अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी प्रास्ताविक केले. सखाराम माने यांनी आभार मानले. डॉ. रत्नाकर पंडित, प्रेस क्लबचे उपाध्यक्ष प्रशांत आयरेकर, डॉ. जयप्रकाश पाटील, डॉ. सुमेधा साळुंखे, अनुप जत्राटकर यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments