27.6 C
Pune
Wednesday, July 29, 2026
Home महाराष्ट्र २ ऑगस्टला लातूरमध्ये रंगणार भव्य ‘पंचसूत्री’ सोहळा

२ ऑगस्टला लातूरमध्ये रंगणार भव्य ‘पंचसूत्री’ सोहळा

0
25

दशनाम गोसावी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचा संकल्प;

२ ऑगस्टला लातूरमध्ये रंगणार भव्य ‘पंचसूत्री’ सोहळा■

पत्रकार परिषदेत धर्मवीर भारती व व्यंकटेश पुरी यांनी जागवल्या देव, देश अन् धर्माच्या स्मृती!

लातूर (दि. २८ जुलै) : “दशनाम गोसावी समाजाने देव, देश आणि धर्माच्या रक्षणासाठी ऐतिहासिक आणि अतुलनीय योगदान दिले आहे. हा गौरवशाली इतिहास डोळ्यांसमोर ठेवूनच, समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि पुढील पिढीला सक्षम करण्यासाठी आमचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत,” असे प्रतिपादन व्यंकटेश पुरी आणि प्रतिष्ठित उद्योजक धर्मवीर भारती यांनी केले.

दशनाम गोसावी समाज , लातूर या सामाजिक संस्थेच्या वतीने रविवार, दिनांक २ ऑगस्ट २०२६ रोजी लातूर येथील भालचंद्र ब्लड बँक सभागृहात सकाळी १०:०० वाजता आयोजित भव्य ‘पंचसूत्री सोहळ्याची’ माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते संयुक्तपणे बोलत होते. गेली ३१ वर्षे, म्हणजेच १९९६ पासून दशनाम गोसावी समाज ही संघटना लातूरमध्ये समाजकार्यात अत्यंत सक्रियपणे कार्यरत असून अनेक वैविध्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना सातत्याने प्रोत्साहन देत आहे, हाच वारसा पुढे नेत या भव्य कार्यक्रमाची अधिकृत घोषणा करण्यात आली.

या पत्रकार परिषदेत उद्योजक धर्मवीर भारती यांच्या समाज उन्नतीसाठीच्या मोठ्या योगदानाचा आणि त्यांनी समाजातील होतकरू व गुणवंत विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी वेळोवेळी पुढे केलेल्या मदतीच्या हाताचा विशेष गौरव करण्यात आला. यावेळी गोसावी वुमन्स विंगच्या सुरेखा धर्मवीर भारती (भारती मॅडम) यांनी आपले मनोगत व्यक्त करताना प्रतिष्ठानच्या व्यापक उद्दिष्टांवर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या की, २ ऑगस्ट रोजी होणारा हा पंचसूत्री सोहळा केवळ एक कौतुक सोहळा नसून समाज बांधणीसाठी घेतलेला एक ध्यास आहे. समाजातील गरजू महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी ‘भारती फाउंडेशन’च्या वतीने शैक्षणिक साहित्यासोबतच शिलाई मशीन वाटप केवळ एवढ्यावरच न थांबता हळदीकुंकू आणि विविध सांस्कृतिक सणांच्या माध्यमातून आपली संस्कृती जपण्याचे काम ही विंग करत आहे. समाजातील विधवा महिलांना सन्मानाने मुख्य प्रवाहात आणून, त्यांना आत्मनिर्भर बनवण्याचा आमचा दृढ संकल्प आहे. कार्यपद्धतीत सकारात्मक बदल घडवून आणणे, हाच यामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतात स्पष्ट केले.

या पत्रकार परिषदेत अल्का गोसावी यांच्यासह विनायक गिरी, राजेंद्र गिरी, मोती गिरी गोसावी, मकरंद गिरी, प्रमोद बन, पद्माकर गिरी, विश्वजीत गिरी, चंद्रशेखर गिरी आणि बाळासाहेब भारती आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. २ ऑगस्ट रोजी होणाऱ्या या मुख्य सोहळ्याला प्रमुख पाहुणे आणि उद्घाटक म्हणून हभप श्री. महादेव महाराज चाकरवाडीकर तसेच प्रमुख वक्ते म्हणून हभप श्री. अविनाशजी भारती महाराज, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. स्वप्निल भय्या भारती, प्रमुख अतिथी सूर्यकांता गिरी गोसावी, पुणे यांच्या सह महाराष्ट्राच्या विविध कोपऱ्यांतून नामांकित व्यक्ती श्री. सुखदेव गिरी (कोल्हापूर), श्री. अनुप गोसावी (नाशिक), श्री. ओमप्रकाश गिरी (बीड), श्री. मुन्ना गिरी गोसावी, पंढरपूर आणि श्री. गणेश पुरी (नागपूर) हे प्रामुख्याने उपस्थित राहून कार्यक्रमाचे उद्घाटन व मार्गदर्शन करणार आहेत. या सोहळ्यात सत्कार आणि स्कॉलरशिपचा लाभ मिळवण्यासाठी गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या मार्क मेमोसह ९९२०६ २११११ (मयूर भारती प्रॉपर्टीज ऑफिस) या क्रमांकावर त्वरित संपर्क साधून आपली नावनोंदणी करून घेणे आवश्यक आहे. लातूरच्या या ऐतिहासिक आणि प्रबोधनपर सोहळ्यास दशनाम गोसावी समाजातील सर्व समाज बांधव, भगिनी, आणि युवक-युवतींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उद्घाटकांच्या विचारांचा लाभ घ्यावा आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे नम्र आवाहन दशनाम गोसावी समाज, लातूरच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[lead_popup_form_builder]