औसा शहरात भाजपची तिरंगा रॅली उत्साहात
आमदार अभिमन्यू पवार यांच्या उपस्थितीत हनुमान मंदिर ते नंदी मठ पायी रॅली
औसा : भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभरात ९ ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत ‘तिरंगा रॅली’ अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या देशव्यापी अभियानाचा एक भाग म्हणून औसा शहरात रविवार, दि. ९ ऑगस्ट रोजी आमदार अभिमन्यू पवार यांच्या उपस्थितीत पायी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले.
औसा शहरातील हनुमान मंदिर येथून रॅलीला सुरुवात झाली. हातात तिरंगा ध्वज घेत भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने या रॅलीत सहभागी झाले. हनुमान मंदिरापासून सुरू झालेली ही रॅली शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करत नंदी मठ येथे पोहोचली.यावेळी कार्यकर्त्यांनी देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा घोषणांसह हातात तिरंगा घेऊन कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहाचे दर्शन घडविले.

आमदार अभिमन्यू पवार यांच्या उपस्थितीमुळे रॅलीला विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. भाजपच्या विविध आघाड्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक या तिरंगा रॅलीत सहभागी झाले होते.भारतीय स्वातंत्र्यदिनाचा उत्सव प्रत्येक नागरिकाच्या मनात देशभक्तीची भावना अधिक दृढ करणारा ठरावा, तसेच राष्ट्रध्वजाबद्दल आदर आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश जनमानसात पोहोचावा, या उद्देशाने या तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले.





