संकल्प दुष्काळमुक्तीचा!
माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांचे वर्षभराचे मानधन दुष्काळग्रस्तांच्या सेवेसाठी समर्पित
लातूर (प्रतिनिधी) : जिह्यामध्ये २०१५-१६ च्या भीषण दुष्काळानंतर यंदा पुन्हा एकदा पावसाने ओढ दिल्यामुळे दुष्काळाचे गडद सावट निर्माण झाले आहे. शेतकरी आणि ग्रामीण भागातील जनता या संकटामुळे होरपळून निघत असतानाच, माजी मंत्री आणि निलंग्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी जणसेवेचा एक आदर्श वस्तुपाठ समोर ठेवला आहे.
विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर त्यांनी आपले आगामी पूर्ण वर्षभराचे आमदारकीचे मानधन दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचा ऐतिहासिक संकल्प केला आहे.पाणीटंचाई आणि चाऱ्याचा प्रश्न सोडवण्याला सर्वोच्च प्राधान्यग्रामीण भागात सध्या तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली असून, शेतकऱ्यांसमोर आपल्या पशुधनाला वाचवण्यासाठी चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ही भीषण परिस्थिती ओळखून आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी तातडीने मदतीचा हात पुढे केला आहे.

या संकल्पाबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, त्यांच्या वर्षभराच्या मानधनाची संपूर्ण रक्कम ही केवळ आणि केवळ दुष्काळग्रस्त नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करणे, टँकर्सची व्यवस्था आणि जनावरांच्या छावण्यांसाठी चारा उपलब्ध करून देणे यांसाठीच प्रामुख्याने खर्च केली जाईल. या निधीचा थेट फायदा तळागाळातील गरजूंपर्यंत पोहोचवला जाणार आहे.”मी पहिले पाऊल उचलले आहे, आता तुमची साथ हवी!”विजयादशमीच्या मुहूर्तावर जनतेशी संवाद साधताना आ. निलंगेकर भावूक झाले. त्यांनी राज्यातील जनतेला आणि सक्षम नागरिकांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.

ते म्हणाले, “दुष्काळाचे हे संकट अस्मानी आहे, पण त्याचा मुकाबला करण्याची ताकद आपल्या नियोजनात असायला हवी. शेतकरी आणि ग्रामीण जनता आज पाण्यासाठी आणि पशुधनासाठी संघर्ष करत आहे. परिस्थिती बदलण्यासाठी मी माझे पहिले पाऊल उचलले आहे. हे संकट मोठे आहे आणि या संकटाचा सामना करण्यासाठी मला समाजातील प्रत्येक घटकाची, प्रत्येक नागरिकाची साथ अपेक्षित आहे. प्रत्येकाने आपापल्या परीने योगदान देऊन या संकट काळात दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे.असे आवाहन माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले आहे.
राजकारणात केवळ आश्वासने देण्याच्या काळात प्रत्यक्ष कृती करत आपले हक्काचे मानधन जनतेसाठी सुपूर्द करण्याच्या हा निर्णय घेणारे जिह्यासह मराठवाड्यातील माजी मंत्री आ. निलंगेकर पहिले आमदार असतील. या निर्णयामुळे लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यातील दुष्काळ दूर करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संस्था ही पुढे येतील असा विश्वास वाटत आहे. संकटावर मात करणे हीच प्रेरणा विजयादशमी प्रत्येकाला देते या संकल्पामुळे दुष्काळाचे संकट दूर होईल अशी अपेक्षा सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे.




