हरंगुळ रेल्वे स्थानकाच्या समस्यांची डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून दखल!
निवेदनाची दखल घेत रेल्वेमंत्र्यांकडे पाठपुरावा; प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
लातूर : हरंगुळ रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्मची अपुरी उंची, अस्वच्छता आणि मूलभूत सुविधांच्या अभावामुळे प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्यांची डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दखल घेतली आहे. या संदर्भात त्यांना निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे निवेदन पाठवून या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
हरंगुळ स्थानकावर प्लॅटफॉर्म आणि रेल्वेच्या पायऱ्यांमधील उंचीच्या फरकामुळे प्रवाशांना चढताना-उतरताना अडचणींचा सामना करावा लागतो. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले आणि दिव्यांग प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा प्रश्न महत्त्वाचा आहे. तसेच स्थानक परिसरातील स्वच्छता आणि आवश्यक सुविधांमध्ये सुधारणा होणे गरजेचे आहे.

या समस्यांची दखल घेत डॉ. गोऱ्हे यांनी प्लॅटफॉर्मची उंची रेल्वेच्या मानकांनुसार वाढवणे, आवश्यकतेनुसार लांबी वाढवणे, स्वच्छता सुधारणे आणि पिण्याचे पाणी, शौचालये, आसनव्यवस्था, निवारा व प्रकाशव्यवस्था यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
तसेच, सुधारणा पूर्ण होईपर्यंत संबंधित रेल्वे सेवा लातूर शहर रेल्वे स्थानकातून चालविण्याच्या व्यवहार्यतेची तपासणी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती रेल्वे बोर्ड आणि मध्य रेल्वेच्या संबंधित अधिकाऱ्यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.

नागरिकांनी मांडलेल्या प्रश्नांची दखल घेऊन त्या संदर्भात वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा होणे ही सकारात्मक बाब आहे. आता रेल्वे प्रशासनाकडून या मागण्यांवर ठोस निर्णय घेऊन हरंगुळ रेल्वे स्थानकावरील प्रवाशांच्या अडचणी दूर केल्या जातात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हरंगुळ स्थानकावरील सुविधा सुधारणे हा केवळ सोयीचा नव्हे, तर प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. त्यामुळे संबंधित रेल्वे प्रशासनाने या मागण्यांवर लवकरात लवकर कार्यवाही करावी, अशी अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.





