पाणी हा सर्व नागरिकांचा मूलभूत अधिकार; दुष्काळजन्य परिस्थितीत मनपाने पाणी गळती थांबवून नियोजनबद्ध पाणीपुरवठा करावा
— माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख व भंते पय्यानंद थेरोयांच्या प्रमुख उपस्थितीत ‘डिस्कव्हरी ॲक्वा’चा शुभारंभ
लातूर प्रतिनिधी : शुक्रवार, दि. २० नोव्हेंबर २०२६लातूर शहरातील विक्रमनगर परिसरातील पंचशील चौक येथे प्रविण कांबळे यांनी सुरू केलेल्या ‘डिस्कव्हरी ॲक्वा’या शुद्ध पाणी निर्मिती व्यवसायाचा शुभारंभ शुक्रवार, दि. २० नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री, लातूरचे माजी पालकमंत्री तथा महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार अमित विलासराव देशमुख आणि भंते पय्यानंद थेरो यांच्या हस्ते संपन्न झाला.

या कार्यक्रमास लातूर शहर महानगरपालिकेच्या महापौर सौ. जयश्री सोनकांबळे, उपमहापौर ॲड. स्नेहल उटगे, मनपा सभागृह गटनेते विजयकुमार साबदे, शहराध्यक्ष प्रा.डॉ.शिवाजी जवळगेकर, स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले यांच्यासह प्रा. शिवशरण हावळे, ॲड. दीपक सुळ, विकास वाघमारे, सौ. छायाताई बंडगर, पवन सोलंकर, ॲड. दीपक मुळक, सौ. सुजाता अजनीकर, सौ. प्रियंका सुरवसे, डॉ. बालाजी साळुंके, डॉ. दिनेश नवगिरे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, मित्रपरिवार तसेच परिसरातील नागरिक व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

समारंभ अनावश्यक खर्च टाळून साधेपणाने साजरे करावेतयावेळी बोलताना आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, लातूर आणि लातूरमधील सर्वांच्या कार्यक्रमात आपण जातो, तेव्हा हा प्रसंग आपल्या घरी गेल्यासारखाच असतो. यामुळे सभा-समारंभ साध्या पद्धतीने साजरे करावेत आणि अनावश्यक खर्च टाळावा; कोणताही कार्यक्रम घेत असताना तो साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी त्यांनी केले.

प्रा. प्रवीण कांबळे यांचे कौतुक करताना ते म्हणाले की, प्रवीण कांबळे हे चांगले भाषण करणारे पदाधिकारी असून त्यांचे विचार हे बुद्धिमत्तेची साक्ष देतात; त्यांच्यासारख्या पदाधिकाऱ्यांचे भविष्य नेहमीच उज्ज्वल असते. त्यांनी व्यवसायात पाऊल टाकून ‘डिस्कव्हरी ॲक्वा’ हा शुद्ध पाणी निर्मितीचा व्यवसाय सुरू केला आहे. या माध्यमातून लातूरकरांना शुद्ध आणि आरोग्यदायी पाणी उपलब्ध व्हावे, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.दुष्काळात पाणी नियोजन आणि सांडपाणी पुनर्वापराची गरजसध्याच्या पाणीटंचाईवर भाष्य करताना आमदार देशमुख यांनी लातूर महानगरपालिकेला महत्त्वाच्या सूचना केल्या. ते म्हणाले की, सध्या दुष्काळ असून पाण्याची टंचाई आहे; त्यामुळे पाण्याचा अपव्यय करू नये आणि पाण्याची गळती होऊ नये यासाठी सर्व मनपा प्रशासन आणि नगरसेवकांनी विशेष काळजी घ्यावी. येणाऱ्या काळामध्ये नळाला पिवळे व गढूळ पाणी येणार नाही याची दक्षता घ्यावी. असे गढूळ पाणी येणे पूर्णपणे बंद होऊन नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्यास मनपाने पुढाकार घ्यावा.आपण दैनंदिन जीवनात लातूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात लाखो लिटर पाणी वापरतो, ते पाणी तसेच वाहून जाऊन त्याचा अपव्यय होतो. या पाण्याचे शुद्धीकरण करून त्याचा पुनर्वापर करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. या सांडपाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी लातूरमध्ये पुनर्वापर यंत्रणा उभी करावी आणि वापरलेल्या पाण्यातून नवीन पाणी निर्माण करून ते आवश्यक त्या ठिकाणी लातूरमधील नागरिकांना देता आले पाहिजे, अशी सूचना त्यांनी केली.

मनपा पदाधिकाऱ्यांसाठी कसोटीचा प्रसंग;पाणी वितरण व्यवस्था सुधारावी
दुष्काळ असल्यामुळे पाणीटंचाई जाणवेल, पण नागरिकांनी घाबरून जाऊ नये. लातूरमध्ये ‘सनरिच’ नावाची कंपनी असून या कंपनीकडून राज्यातच नव्हे तर देशभर शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जातो; मग लातूरमध्ये कुठे पाणीटंचाई जाणवणार आहे, असेच म्हणावे लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.पुढे बोलताना ते म्हणाले की, हा सर्वांसाठी कसोटीचा प्रसंग आहे. या दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये लातूर मनपाचे महापौर, उपमहापौर, गटनेते आणि नगरसेवक कशा पद्धतीने काम करतात हे अत्यंत महत्त्वाचे आहे. नगरसेवकांनी व गटनेत्यांनी पाण्यासाठी आणखी काय करता येईल आणि कोणत्या पद्धतीचे नियोजन करता येईल, या संदर्भाने पाहणी व विचार करावा. लातूरमध्ये पाणीपुरवठा करत असताना पाणी वितरण व्यवस्था सुधारावी, पाण्याची गळती थांबवावी, अनधिकृत नळ जोडण्या कमी कराव्यात आणि या संदर्भात पाणी सुधारणेसाठी मनपाने तातडीने पावले उचलावीत. पाणी हा सर्व नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे, त्यामुळे सर्वांना शुद्ध पाणी उपलब्ध झाले पाहिजे. लातूर महानगरपालिकेने पाणी देत असताना नागरिकांना पाणी वितरण कशा पद्धतीने होत आहे आणि पुढे कसे होणार आहे, याची स्पष्ट माहिती द्यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे प्रस्तावीक प्रविण कांबळे यांनी केले.




