Homeसामाजिकपादुका दर्शन सोहळा आर्थिक व्यवहारा संदर्भात धरणे आंदोलन

पादुका दर्शन सोहळा आर्थिक व्यवहारा संदर्भात धरणे आंदोलन

पादुका दर्शन सोहळा आर्थिक व्यवहारातील दोषींवर कारवाईच्या मागणीसाठीच्या धरणे आंदोलनास उत्स्फूर्त प्रतिसाद

३ जूनला मांजरा कारखान्यासमोर रास्ता रोको करणार : प्रदीप पाटील खंडापूरकर

लातूर : लातूर तालुक्यातील खंडापूर येथे दि. २२ फेब्रुवारी ते २ मार्च २०२६ या कालावधीत पार पडलेल्या उत्सव संतांचा, कुंभमेळा वारकऱ्यांचा पादुका दर्शन सोहळ्यासाठी देणगी स्वरूपात आलेल्या रकमेमध्ये कोट्यवधी रुपयांचा अपहार किशोर जाधव व अन्य आयोजकांनी केला आहे . या प्रकरणातील दोषींवर अटकेची कार्यवाही करून आर्थिक व्यवहाराची सखोल चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी शुक्रवार दि. २२ मे रोजी लातूर शहरातील गांधी चौकात अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने आयोजित धरणे आंदोलनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

याच मागणीसाठी येत्या दि. ३ जून २०२६ रोजी मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्यासमोर रास्ता रोको आंदोलन करणार असल्याची माहिती समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर यांनी दिली.

या पादुका दर्शन सोहळ्यात कोट्यवधी रुपयांचा अपहार करण्यात आल्याची तक्रार अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती एवं ब्रिक्स ह्युमन राईट मिशनचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर यांनी एका लेखी निवेदनाद्वारे लातूरच्या पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.

खंडापूर येथे पार पडलेल्या पादुका दर्शन सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील अनेक संत आले होते. महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेश, तेलंगणा आदी भागातून वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या सोहळ्याचा जवळपास ६० लाखांहून अधिक भाविकांनी आनंद घेतला होता. सोहळ्यासाठी अंदाजे ३७०० देणगी पुस्तिका छापण्यात आल्या होत्या. प्रत्येक देणगी पावती पाच हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेची आहे. या सोहळ्यासाठी छोटे कदम माऊली महाराज व तोतया भामटा किशोर जाधव शिवणीकर हे संपूर्ण मराठवाड्यात फिरून लोकांकडून मदत, पैसे गोळा करत होते. यात विशेष योगदान खंडापूरच्या नागरिकांचे आहे. खंडापूरच्या लोकांनी स्वतःच्या खर्चाने परिसर स्वच्छ करून दिला. कार्यक्रमासाठी भाविकांनी स्वयंस्फूर्तीने सहकार्य केल्याचे सर्वांनी पाहिलेही आहे. या सोहळ्यात झालेल्या अपहार आणि गैरव्यवहाराची सखोल चौकशी करण्याच्या मागणीसाठी सदर आंदोलन करण्यात आले.

यावेळी किशोर जाधव शिवणीकर याच्या प्रतिमेस जोडेही मारण्यात आले. या सोहळ्यासाठी वेगवेगळ्या भागातून भाकरी, चपात्या, पुरणपोळ्या, दूध, तूप, भाज्या आदी साहित्य पुरवले गेले. या सोहळ्यासाठी सामान्य नागरिकांसह विविध संस्था, राजकीय पुढाऱ्यांनीही मोठ्या रकमा देणगी स्वरूपात दिल्या आहेत. तसेच दानपेटीच्या माध्यमातूनही अंदाजे ५ कोटी रुपयांची रक्कम जमा झाली आहे. पावती पुस्तकांच्या माध्यमातूनही किमान १८ कोटी ५० लाख रुपये जमा झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. औसा येथे धान्य विक्रीतून ४० लाख रुपये आल्याचा उल्लेखही त्यात करण्यात आला आहे.

या रकमा ज्या बँक खात्यावर जमा झाल्या, त्या कोणाच्या खात्यात जमा केल्या व कोणाच्या परवानगीने याची चौकशी होणे गरजेचे आहे. तसेच भक्ती शक्ती पावन धाम सेवाभावी संस्था या संस्थेचे बँक खाते गोठवून संस्थेची चौकशी व्हावी, संस्थेच्या सर्वसंचालकानाची बँक खाती व मालमत्ता शासनाने तात्काळ ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत,अशी मागणीही यावेळी करण्यात आली. या प्रकरणातील दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांची सखोल चौकशी करण्यात यावी. अन्यथा येत्या दि. ३ जून रोजी मांजरा सहकारी साखर कारखान्यासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वातंत्र्य सैनिक प्रदीप पाटील खंडापूरकर यांनी दिला आहे. या धरणे आंदोलनात अमोल नानजकर , एड. राणीताई स्वामी, पृथ्वीराजसिंह पाटील,नेताजी जाधव, काशीबाई हांडे, योगीताताई ठाकूर, रामेश्वर डोणे , अमोल भालेराव, भीमराव वराडे, पृथ्वीराज पवार, पंडितराव लखनगिरे , अमर कैले, बप्पा टेळे, सुरेश जाधव, सुरेखा गाडेकर, संतोष तुरूप, टीनाताई शिंदे, शाहीर शिंदे, महेश पाटील, नागेश जाधव, दिनेश कांबळे, तुषार रेड्डी, गोपाळ माळी यांसह अनेक मान्यवर सहभागी झाले होते.

——————-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments