*हरंगुळ–हडपसर रेल्वे नियमित होऊनही तीन महिन्यांपासून प्रवाशांकडून वाढीव तिकीट आकारणी; रेल्वे प्रशासनाविरोधात तीव्र संताप*
लातूर : हरंगुळ–हडपसर रेल्वेला मिळालेला मोठा प्रवासी प्रतिसाद लक्षात घेऊन रेल्वे बोर्डाने 17 मार्च 2026 रोजी ही रेल्वे कायमस्वरूपी (नियमित) करण्याबाबत परिपत्रक जारी केले. त्यानंतर तीन महिन्यांहून अधिक कालावधी उलटूनही संबंधित परिपत्रकाची प्रभावी अंमलबजावणी झालेली नसल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, रेल्वे नियमित करण्याचा निर्णय झाल्यानंतरही या गाडीसाठी आजही प्रायोगिक गाडीप्रमाणेच सुमारे 30 टक्के वाढीव तिकीट भाडे आकारले जात आहे. त्यामुळे दररोज प्रवास करणारे नोकरदार, विद्यार्थी, व्यापारी तसेच सर्वसामान्य प्रवाशांवर अनावश्यक आर्थिक भार पडत असून, रेल्वे बोर्डाच्या निर्णयानंतरही वाढीव भाडे आकारले जात असल्याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.याशिवाय, हरंगुळ–हडपसर तसेच हडपसर–हरंगुळ रेल्वे गेल्या काही दिवसांपासून वारंवार तीन ते चार तास उशिराने धावत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. परिणामी प्रवाशांचे दैनंदिन नियोजन विस्कळीत होत असून, कार्यालये, शैक्षणिक संस्था, व्यावसायिक कामे तसेच वैद्यकीय कारणांसाठी प्रवास करणाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे

.हरंगुळ रेल्वे स्थानकावर पुरेशी आसनव्यवस्था, स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, प्रतीक्षागृह तसेच रेल्वेच्या आगमन-प्रस्थानाची अचूक माहिती देणारी यंत्रणा यांसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याची तक्रारही प्रवाशांकडून सातत्याने केली जात आहे. रेल्वे उशिराने येत असताना ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग आणि लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या कुटुंबांची विशेष गैरसोय होत असल्याचेही नागरिकांनी नमूद केले आहे.दरम्यान, हरंगुळ–हडपसर रेल्वेचा खडकी व पिंपरी-चिंचवडपर्यंत विस्तार करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरत आहे. हडपसर येथे प्रवास संपत असल्यामुळे पुणे शहरातील औद्योगिक, आयटी, शैक्षणिक आणि संरक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या हजारो प्रवाशांना अतिरिक्त वेळ आणि खर्च करावा लागतो. रेल्वेचा विस्तार खडकी किंवा पिंपरी-चिंचवडपर्यंत झाल्यास प्रवाशांचा वेळ, पैसा आणि श्रम मोठ्या प्रमाणात वाचतील, तसेच पुणे जंक्शनवरील ताण कमी होण्यासही मदत होईल, असे प्रवाशांचे मत आहे
.रेल्वे संघर्ष समिती तसेच विविध सामाजिक संघटनांनी यापूर्वी अनेक वेळा निवेदने देऊन 17 मार्च 2026 च्या रेल्वे बोर्डाच्या परिपत्रकाची तातडीने अंमलबजावणी, वाढीव तिकीट आकारणी त्वरित बंद करणे, हरंगुळ स्थानकावरील मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे आणि रेल्वेचा खडकी व पिंपरी-चिंचवडपर्यंत विस्तार करणे, या मागण्या सातत्याने लावून धरल्या आहेत.प्रवाशांचे म्हणणे आहे की, रेल्वे बोर्डाने कायमस्वरूपी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतरही त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नसल्याने आणि आजही वाढीव तिकीट भाडे आकारले जात असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. रेल्वे प्रशासनाने या प्रश्नांची तातडीने दखल घेऊन परिपत्रकाची प्रभावी अंमलबजावणी करावी, वाढीव भाडे आकारणी थांबवावी आणि प्रवाशांना न्याय द्यावा, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.




