*सहकारात बांबूचा अंतर्भाव करावा*
=========
पाशा पटेल यांचे केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांना साकडे
==========
*…तर शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीचा मा. मोदींचा मार्ग सुकर होईल-पटेल*
अनिश्चित पावसात निश्चित येणारे बांबू हे पीक बहुगुणी असून, त्यापासून अनेक वस्तू तयार करता येतात. या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून सहकारात बांबूचा अंतर्भाव केल्यास खऱ्याअर्थाने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मार्ग अधिक सुकर होईल, असा विश्वास व्यक्त करून पर्यावरणात मोदींना जगाचे नेतृत्व करता येण्यासाठी बांबू हे प्रभावी माध्यम असल्याने त्या दिशेने प्रयत्न करावेत, अशी विनंती यावेळी पाशा पटेल यांनी अमित शहा यांना केली.
*नवी दिल्ली/वृत्तसेवा* – सहकारी साखर कारखाने, सूत गिरण्या याप्रमाणेच बांबू हा आर्थिक समृद्धी प्राप्त करून देणारा असल्याने, बांबूचा अंतर्भाव सहकारात करावा, असे साकडे महाराष्ट्र कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष, पर्यावरण अभ्यासक तथा देशभर बांबू लागवडीची चळवळ उभारणारे पाशा पटेल यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांना आज मंगळवारी (ता. 22) घातले असता, त्यांनी ही बाब गांभीर्याने घेत सकारात्मक प्रतिसाद दिला.

सहकाराच्या बाबतीत एक नवीन आशा तयार होऊ लागली असून, अमित शहा यांच्यामुळे सहकारातून ग्रामीण विकासाच्या अनेक संधी प्राप्त होत आहेत, त्यामुळे पाशा पटेल यांनी आज नवी दिल्ली येथे अमित शहा यांचा महाराष्ट्रीयन पद्धतीचा फेटा बांधून सत्कार केला. याप्रसंगी त्यांच्यासमवेत पाशा पटेल यांचे सहकारी संजय करपे, पंजाबचे शेतकरी महेश शहादा यांची उपस्थिती होती. यावेळी अमित शहा यांनी चर्चेसाठी तब्बल 20 मिनिटे वेळ दिला. याप्रसंगी पाशा पटेल यांनी सहकारात बांबूचा अंतर्भाव केला तर सहकार नसलेल्या आसाम, त्रिपुरा, मेघालय, बंगाल, बिहार, ओरिसा आदी 7 राज्यात सहकार प्रस्थापित होईल, असे सांगितले. ते पुढे म्हणाले की, सहकार क्षेत्रात बांबूचा समावेश करून सहकार निर्मिती करणे शक्य होणार आहे. त्या माध्यमातून देशाची आर्थिक समृद्धीही करता येईल. बांबू उत्पादक शेतकऱ्यांना दुपटीपेक्षा जास्त पैसे बांबूमुळे मिळू शकतात. उदाहरणच द्यायचे झाल्यास आसाममधील नुमालिगड येथे ऑगस्ट 2022 पासून बांबूपासून इथेनॉल निर्मितीचा जगातील पहिला रिफायनरी प्रकल्प सुरू होत आहे, ही बाब बांबू लागवड करणाऱ्यांना मोठी बाजारपेठ उपलब्ध करून देणारी आणि दुपटीपेक्षा अधिक सुबत्ता मिळवून देणारी आहे. बांबूच्या समावेशामुळे सहकाराला नवीन रुपडे मिळेल, असा विश्वास पाशा पटेल यांनी यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान व्यक्त केला.

पावसाच्या अनिश्चिततेमुळे पारंपारिक शेती परवडेनाशी झाली आहे. मात्र, अनिश्चित पावसात निश्चित उत्पन्न देणारा बांबू आहे कमी खर्चात, कमी मनुष्यबळात येणारे हे पीक असून बांबूपासून कपडे, खेळणी, लोणचे, फर्निचर, फ्लोरिंग, कागद आदी 1800 वस्तू तयार करता येतात. त्यामुळे बांबूला न्याय मिळावा, यासाठी बांबूचा सहकारात समावेश करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी विनंती पाशा पटेल यांनी केली असता, अमित शहा यांनी ही बाब गांभीर्याने घेत त्यावर विचार करण्याचा शब्द दिला. याप्रसंगी पाशा पटेल यांनी महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षापासून राबविल्या जात असलेल्या बांबू लागवड चळवळ आणि इंधन म्हणून बांबूचा वापर करण्याबाबत केल्या जात असलेल्या जनजागृतीची माहिती अमित शहा यांना दिली.












