39 C
Pune
Friday, May 8, 2026
Homeसहकार'राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन’ इमारतीचे भूमिपूजन

‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन’ इमारतीचे भूमिपूजन

औसा बाजार समितीत ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन’सह विविध सुविधा इमारतींचे भूमिपूजन

योग्य दर, वेळेवर पैसे आणि पारदर्शक व्यवहारामुळे औसा बाजार समितीची विश्वासार्हता वाढली- आ अभिमन्यू पवार

पक्ष कोणताही असो; शेतकरी हिताच्या संस्था सक्षमपणे चालल्या पाहिजेत, हीच आमची भूमिका आहे.- आ अभिमन्यू पवार

औसा : कृषी उत्पन्न बाजार समिती, औसा येथील मुख्य बाजार आवारात उभारण्यात येणाऱ्या सुसज्ज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन तसेच इतर सुविधा इमारतींच्या बांधकामाचे भूमिपूजन व शिलान्यास समारंभ दि. ७ मे रोजी पार पडला. यावेळी आमदार पवार यांनी औसा बाजार समितीच्या प्रगतीचा आढावा घेत शेतकरी हिताच्या विविध योजनांबाबत महत्त्वपूर्ण भूमिका मांडली.

यावेळी बोलताना आमदार पवार म्हणाले की, “तीन वर्षापुर्वी केवळ ५ कोटी रुपयांच्या ठेवी असलेली औसा कृषी उत्पन्न बाजार समिती आज १७ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. पारदर्शक कारभार आणि शेतकरी हिताचे निर्णय यामुळे मराठवाड्यात अग्रगण्य बाजार समिती म्हणून औसा बाजार समितीची ओळख निर्माण झाली आहे. विभागात दुसऱ्या क्रमांकाची बाजार समिती म्हणून मानाचे स्थान मिळाले असून लातूर जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आणण्याचा आमचा संकल्प आहे.

त्यांनी पुढे सांगितले की, अत्यंत पारदर्शक कारभारातून बाजार समितीने शेतकरी, व्यापारी आणि सर्व घटकांचा विश्वास संपादन केला आहे. बाजार समिती अंतर्गत विविध सेवा-सुविधांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आला असून भविष्यातही विकासकामांसाठी आणि शेतकरी सुविधांसाठी आवश्यक ते सहकार्य व निधी दिला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.शेतकरी बांधवांना बाजार समितीत सन्मानाने थांबता यावे, जेवण व विश्रांतीची सुविधा मिळावी यासाठी “राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन” उभारण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागातून बाजार समितीत येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.सोयाबीन, हरभरा यांसारख्या पिकांवर प्रक्रिया करणारे उद्योग उभारण्याचे प्रयत्न सुरू असून प्रक्रिया उद्योगांमुळे शेतीमालाला अधिक मूल्य मिळून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शेतकरी हा मतदारसंघाच्या विकासाचा केंद्रबिंदू असल्याचे सांगताना आमदार पवार म्हणाले की, “पक्ष कोणताही असो; शेतकरी हिताच्या संस्था सक्षमपणे चालल्या पाहिजेत, हीच आमची भूमिका आहे.संत शिरोमणी मारुती महाराज साखर कारखाना सहकार तत्वावर टिकून राहावा आणि शेतकऱ्यांच्या मालकीचा राहावा यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. राज्य शासनाकडून या कारखान्यास १०९ कोटी रुपयांची आर्थिक मदत मिळवून दिल्याची माहितीही त्यांनी दिली.तसेच अनेक वर्षांपासून बंद असलेला श्री निळकंठेश्वर किल्लारी सहकारी साखर कारखाना पुन्हा सहकार तत्वावर सुरू करण्यात आल्याचे सांगून संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांची सर्व उसाची बिले अदा करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

कारखानदारीमुळे परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लागल्याने मोठा दिलासा मिळाल्याचे त्यांनी सांगितले.औसा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य दर, पारदर्शक व्यवहार आणि वेळेवर पैसे मिळत असल्याने शेतकऱ्यांचा विश्वास अधिक दृढ झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.कार्यक्रमात बाजार समितीचे सभापती चंद्रशेखर सोनवणे यांनी बाजार समितीच्या कामकाजाचा आढावा घेत संचालक मंडळाच्या माध्यमातून पारदर्शक कारभार सुरू असल्याचे सांगितले.

या कार्यक्रमास माजी आमदार दिनकरराव माने, पंचायत समितीच्या सभापती गंगाबाई कोदळीकर, भाजप जिल्हा सरचिटणीस सुभाष जाधव,सभापती चंद्रशेखर सोनवणे, बाजार समितीचे उपसभापती भिमाशंकरजी राचट्टे,मारुती महाराज कारखान्याचे संचालक रमेश वळके, क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष परिक्षीत पवार,सहाय्यक निबंधक रमेश सगर, संचालक युवराज बिराजदार, प्रकाश काकडे, सौ. चंद्रकला झिरमिरे प्रवीण कोपरकर, संतोषी वीर, विकास नऱहरे, ईश्वर कुलकर्णी, राधाकृष्ण जाधव, गोविंद भोसले, धनराज जाधव,प्रवीण कोपरकर, शंकर पुंड,सुरेश औटी, संदिपान लंगर, मोहन कावळे मोहन, धुमाळ अजित,समितीचे सचिव संतोष हुच्चे, काकासाहेब मोरे, सुभाष मुक्ता, दिनकर मुंगळे, राजकिरण साठे, विष्णू साळुंखे, शिवलिंग औटी, गोविंदा दळवी,रवी चिलमे, वृषाल देशमुख,शिव मुरगे,विलास साळुंके संजय उजळंबे, आबा पवार, आदींसह आडत व्यापारी, हमाल बांधव आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

…….योग्य दर व वेळीत पैसे मिळत असल्याने औसा

बाजार समितीची पत वाढली – दिनकरराव माने

याप्रसंगी माजी आमदार दिनकरराव माने यांनीही मनोगत व्यक्त करताना सांगितले की, औसा बाजार समितीत शेतीमालाला योग्य भाव आणि शेतकऱ्यांना वेळेवर पैसे मिळत असल्याने बाजार समितीची प्रतिष्ठा वाढली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक दर औसा बाजार समितीत मिळत असल्यामुळे शेतकरी समाधानी असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात बाजार समितीच्या माध्यमातून शेतीमाल प्रक्रिया उद्योग उभारण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

औसा बाजार समितीतील ‘शेतकरी भवन’ केवळ इमारत नसून शेतकऱ्यांसाठी सर्वसमावेशक सुविधा केंद्र असणार आहे.प्रशिक्षण हॉल -आधुनिक शेती तंत्रज्ञान व कार्यशाळांसाठी,माती परीक्षण केंद्र – माती व पाण्याची स्थानिक तपासणी सुविधा,विश्रांती कक्ष – दूरवरून येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी विश्रांती व जेवणाची सोय,माहिती केंद्र – बाजारभाव, शासकीय योजना व हवामान अंदाजासाठी डिजिटल माहिती,खत/बियाणे बँक – स्थानिक व गावरान बियाण्यांचे जतन आणि वितरण केंद्र

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]