Homeसहकारलातूर जिल्हा बँकेवर महायुतीचा झेंडा फडकणार? ;परिवर्तनासाठी नेते एकवटले!

लातूर जिल्हा बँकेवर महायुतीचा झेंडा फडकणार? ;परिवर्तनासाठी नेते एकवटले!

जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी महायुती मैदानात; शेतकऱ्यांच्या हिताचा एल्गार!

लातूर l प्रतिनिधी

शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी स्थापन झालेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत परिवर्तन घडवून आणण्यासाठी महायुतीने निवडणुकीच्या मैदानात जोरदार तयारी सुरू केली आहे. शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक आणि बँकेचा कारभार लोकाभिमुख करण्याचा निर्धार व्यक्त करत महायुतीच्या नेत्यांनी जिल्हा बँकेवर विजयाचा झेंडा फडकवण्याचा विश्वास व्यक्त केला.

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतील **‘रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज परिवर्तन पॅनल’ यांच्या वतीने रविवारी (८ नोव्हेंबर) आमदार रमेशआप्पा कराड यांच्या लातूर येथील भाजपा संवाद कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.

या पत्रकार परिषदेला भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार बसवराज पाटील, माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, आमदार संजय बनसोडे, आमदार रमेशआप्पा कराड, माजी मंत्री विनायकराव पाटील, अ‍ॅड. बळवंतराव जाधव, गणेशदादा हाके, बब्रुवान खंदाडे, त्र्यंबकआबा गुट्टे, संतोष सोमवंशी, दिलीपराव देशमुख, अशोककाका केंद्रे, विक्रमकाका शिंदे, उमेदवार ऋषिकेश कराड, गिरीश पाटील, शरद शिंदे यांच्यासह महायुतीतील भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

महायुतीची एकजूट; परिवर्तन पॅनलला कपबशी चिन्ह

सहकार चळवळ मजबूत आणि लोकाभिमुख करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने सहकार क्षेत्रात महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचे सांगत आमदार बसवराज पाटील यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीचे सर्व नेते एकत्रितपणे उतरल्याचे स्पष्ट केले.

शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून परिवर्तन पॅनलची स्थापना करण्यात आली असून पॅनलला ‘कपबशी’ हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. सक्षम आणि अनुभवी उमेदवारांना संधी देण्यात आली असून पॅनलच्या पाठीशी जनाधार असल्याचा दावा त्यांनी केला.

निवडणुकीत चांगल्या पद्धतीने विजय मिळवून महायुतीचा झेंडा फडकवू आणि मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर संभाजीराव निलंगेकरांची टीका

शेतकऱ्यांच्या हितासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या धोरणानुसार मजबुतीने उभे राहण्याची गरज असल्याचे सांगत आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर टीका केली.

सत्ताधाऱ्यांना आपल्या कामावर विश्वास असता तर निवडणुकीत इच्छुकांच्या अर्जांवर आक्षेप घेतले नसते आणि निवडणूक प्रक्रिया सुरळीत होऊ दिली असती, असे ते म्हणाले.

निवडणुकीच्या प्रक्रियेत घडलेल्या घटनांवर त्यांनी आक्षेप घेत लोकशाहीच्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले. बँकेच्या निवडणुकीत शेतकऱ्यांचे प्रश्न आणि बँकेच्या कारभारावर चर्चा होणे अपेक्षित असताना व्यक्तिगत टीका-टिप्पणी करून संभ्रम निर्माण केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेस विजयासाठी जिल्हाभर प्रयत्न करणार

महायुतीचा धर्म पाळत यापूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी एकदिलाने काम केले आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही महायुती एकत्रितपणे ताकदीने उतरणार असल्याचे सांगत आमदार संजय बनसोडे यांनी स्वतःसह आमदार विक्रम काळे आणि प्रदेश प्रवक्ते सूरज चव्हाण जिल्हाभर फिरून महायुतीच्या विजयासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून सक्षम उमेदवार दिले असून जिल्हा बँक महायुतीच्या ताब्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जिल्हा बँकेच्या कारभारावर रमेशआप्पा कराड यांचे प्रश्न

जिल्हा बँकेच्या मागील २५ वर्षांच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करत आमदार रमेशआप्पा कराड यांनी शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळाले का, असा सवाल केला.

जिल्हा बँक शेतकऱ्यांसाठी काम करण्याऐवजी एका कुटुंबाला आर्थिक स्थैर्य देत असल्याचा आरोप त्यांनी केला. बिनव्याजी पाच लाख रुपयांचे कर्ज किती शेतकऱ्यांना दिले, याची माहिती जाहीर करण्याचे आव्हानही त्यांनी दिले.

देश एग्रोला महिनाभराच्या आत कोट्यवधी रुपयांचे कर्ज देण्यात आले, मग शेतकऱ्यांना तत्परतेने कर्ज का दिले जात नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

तसेच ३० ते ४० वर्षांनंतरही मांजरा साखर कारखाना कर्जबाजारी कसा आहे, याबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केला. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मतदार महायुतीच्या बाजूने असून महायुतीची सत्ता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

निवडणुकीनंतर महायुतीचा चेअरमन होणार : विनायकराव पाटील

जिल्हा बँकेने महाराष्ट्रात सर्वोत्कृष्ट काम केले असेल तर निवडणुकीला सामोरे जाण्यास घाबरण्याचे कारण काय, असा सवाल माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी केला.

जनतेमध्ये गेल्यानंतर मतदार आपल्या कामाचा हिशेब मागतील, असे सांगत त्यांनी सहकार मंत्र्यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर महायुतीचा चेअरमन होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पत्रकार परिषदेला उपस्थित पत्रकारांचे चंद्रकांत कातळे यांनी आभार मानले. यावेळी महायुतीचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments