लातूरमध्ये जागतिक योग दिन उत्साहात साजरा
*निरोगी राहण्यासाठी प्रत्येकाने योगाचा अंगीकार करावा-जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड*
लातूर, दि. २१: भारतीय संस्कृतीचा अमूल्य ठेवा असलेला योग आज जागतिक पातळीवर स्वीकारला गेला असून, निरोगी आरोग्यासाठी प्रत्येकाने दैनंदिन जीवनात योगाचा अंगीकार करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी आज येथे केले.जागतिक योग दिनानिमित्त लातूर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे विशेष योगाभ्यास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला लातूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

जिल्हा प्रशासन, लातूर शहर महानगरपालिका, पतंजली योग समिती आणि प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी लातूर शहर महानगरपालिकेच्या महापौर जयश्री सोनकांबळे, जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांची प्रमुख उपस्थिती होती.जगातील सुमारे १७० देशांनी योगाचे महत्त्व ओळखून त्याचा स्वीकार केला आहे. त्यामुळेच २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो.

शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी प्रत्येकाने दररोज किमान एक तास योगाभ्यास केला पाहिजे. तसेच, आरोग्यासोबतच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावून त्याचे संवर्धन करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड यांनी यावेळी केले.या प्रसंगी योग शिक्षक विष्णू भुतडा यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितांनी विविध योगासने आणि प्राणायाम केला.
केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने निश्चित केलेल्या योग शिष्टाचारानुसार प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. या कार्यक्रमास जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. सुधीर बनशेळकीकर, श्रुष्टी जगताप तसेच पतंजली योग समिती आणि प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्थेचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, मारवाडी राजस्थान माध्यमिक विद्यालय, बंकटलाल लाहोटी इंग्लिश स्कूल, राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूल, देशिकेंद्र माध्यमिक विद्यालय आणि राजमाता जिजामाता माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हा आयुष अधिकारी डॉ. सुधीर बनशेळकीकर यांनी प्रास्ताविक केले. जागतिक योग दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये, शाळा आणि महाविद्यालयांमध्येही विविध विशेष कार्यक्रमांचे व योगाभ्यास सत्रांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती त्यांनी प्रास्ताविकात दिली.
*****




