बसवराज पाटील यांची ज्येष्ठ विधीज्ञ बळवंतराव जाधव यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट
लातूर, दि. १७ (माध्यम वृत्तसेवा) :स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळवून देणारे माजी राज्यमंत्री तथा आमदार बसवराज पाटील मुरूमकर यांनी ज्येष्ठ विधीज्ञ, सामाजिक व राजकीय कार्यकर्ते अॅड. बळवंतराव जाधव यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट देत विविध सामाजिक, राजकीय आणि समकालीन विषयांवर सविस्तर चर्चा केली.

लातूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील भाजपच्या यशानंतर आमदार बसवराज पाटील हे विविध राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटी घेत संवाद साधत आहेत. त्याच अनुषंगाने त्यांनी अॅड. बळवंतराव जाधव यांच्या कार्यालयास भेट दिली. जवळपास तासभर तेथे थांबून त्यांनी चहापानादरम्यान विविध विषयांवर मनमोकळा संवाद साधला.

यावेळी अॅड. बळवंतराव जाधव यांनी आमदार बसवराज पाटील यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार केला.अॅड. बळवंतराव जाधव यांनी त्यांचे वडील, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक हरिश्चंद्र जाधव यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘संघर्ष योद्धा’ या पुस्तकाची प्रत आमदार बसवराज पाटील यांना भेट दिली. यावेळी आमदार पाटील यांनी स्वातंत्र्यसैनिक हरिश्चंद्र जाधव यांच्या कार्याची माहिती जाणून घेत त्यांच्या योगदानाबद्दल गौरवोद्गार व्यक्त केले.

याप्रसंगी संगमेश्वर ठेसे, बसवराज धाराशिवे, ज्येष्ठ संपादक प्रा. अॅड. बी. व्ही. मोतीपवळे, अॅड. मंचकराव डोणे, अॅड. वैभव सूर्यवंशी, ज्येष्ठ पत्रकार गोपाळ कुळकर्णी, कल्पनाताई बावगे, अनिताताई नागीमे, प्रेमकला लव्हारे, संगीता शेट्ये, शिवकन्या दानाची, कुशल शिंदे, अॅड. परवेजभाई पठाण, बालाप्रसाद सोमाणी, विजयकुमार कांबळे, अॅड. अर्जुनराव जाधव, अॅड. दैविक जाधव, मधुकर आवसकर गुरुजी, गौतम गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.




