जनमाता देवीच्या सोहळ्यात नारीशक्तीचा जागर!
सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते घटस्थापना;
वर्षाताई चौधरी–शिंदे, शरयूताई भोसले–माने यांचा सन्मान
खुर्दळीत भक्ती, कर्तृत्व आणि सामाजिक एकतेचा संगम; मुस्लिम बांधवांचा पालखी मिरवणुकीतील सहभाग ठरला लक्षवेधी
लातूर : देवीभक्तीचा गजर, नारीशक्तीचा गौरव आणि सर्वधर्मसमभावाचा जागर… अशा उत्साहपूर्ण वातावरणात हाळी खुर्द (खुर्दळी), ता. चाकूर येथील श्री जनमाता आई मंदिरात नवरात्रोत्सवाची सुरुवात घटस्थापनेने महाराष्ट्राचे सहकारमंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते झाली. धार्मिक परंपरेला सामाजिक एकतेची जोड देणाऱ्या या सोहळ्यात कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला, तर पालखी मिरवणुकीतील मुस्लिम बांधवांच्या सहभागाने गावातील सलोख्याची परंपरा अधोरेखित झाली.दोन

कर्तृत्ववान महिलांचा गौरवखुर्दळीच्या लेक माता कै.काशीबाई व स्वातंत्र्यसैनिक कै.बळीरामजी सोनटक्के यांच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमात नारीशक्तीचा सन्मान करण्यात आला. सुप्रसिद्ध युट्यूबर व कंटेंट क्रिएटर वर्षाताई चौधरी–शिंदे यांना ‘महाराष्ट्र नारीशक्ती सन्मान २०२६’, तर खुर्दळीच्या लेक माता लातूर जिल्हा परिषदेच्या मदनसुरी गटाच्या सदस्या शरयूताई भोसले–माने यांना ‘महाराष्ट्र स्त्रीशक्ती सन्मान २०२६’ प्रदान करण्यात आला. सहकारमंत्री बाबासाहेब पाटील आणि युवा उद्योजक विशालभैया जाधव यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले. महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करणाऱ्या या उपक्रमाने सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

शेतकऱ्यांसाठी जलयात्रा; पालखीचा भक्तिमय गजरघटस्थापनेनंतर देवीची आरती आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन करण्यात आले. सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते पालखी मिरवणुकीचा प्रारंभ झाला. आराधी आणि वाजंत्रीच्या गजरात निघालेल्या पालखीने गावात भक्तिमय वातावरण निर्माण केले. पर्जन्यवृष्टी व्हावी, शेतीला चांगले दिवस यावेत आणि शेतकरी सुखी व्हावा, या प्रार्थनेसाठी सुहासिनींनी जलयात्रा काढली. नगरप्रदक्षिणेदरम्यान विविध समाजांतील भाविकांनी पालखीचे पूजन केले. मिरवणुकीचा समारोप देवस्थानचे अध्यक्ष शरदभैया पाटील यांच्या हस्ते झाला.

बाबू दिवाणजींच्या सहभागाने सलोख्याचा संदेशया सोहळ्यातील विशेष लक्षवेधी बाब म्हणजे ग्रामपंचायत सदस्य बाबू दिवाणजी यांनी मुस्लिम समाजाचे प्रतिनिधित्व करत सहकुटुंब जनमाता देवीचे पूजन केले. एवढेच नव्हे, तर त्यांनी पालखी खांद्यावर घेऊन मिरवणुकीत सहभाग नोंदविला. श्रद्धेच्या या सोहळ्यातील त्यांच्या सहभागाने धर्माच्या पलीकडे जपल्या जाणाऱ्या गावातील सामाजिक सलोख्याचे दर्शन घडले. गावातील रस्ते सडा-रांगोळ्यांनी सजविण्यात आले होते. साळुंके कुटुंबीयांनीही देवीचे पूजन केले.

मान्यवरांची उपस्थिती;
महाप्रसादाचे आयोजनया कार्यक्रमाला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दयानंद सुरवसे, युवा उद्योजक विशालभैया जाधव, बंजारा समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष देवदासराव राठोड, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव काळे, जिल्हा परिषद सदस्य भानुदास पोटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक यशवंतराव जाधव, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष सिद्धेश्वर अंकलकोटे, पंचायत समिती सदस्या मनिषाताई जाधव, सरपंच प्रचिता संजयकुमार भोसले, अनिल वाडकर, संदीप शेटे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. ह.भ.प. मोहन महाराज खुर्दळीकर यांच्या वतीने महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. श्री जनमाता आई देवस्थान विश्वस्त मंडळ, ग्रामस्थ, तरुण मंडळी आणि भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढविली. नारीशक्तीचा सन्मान, शेतकऱ्यांच्या समृद्धीची प्रार्थना आणि सर्वधर्मीयांच्या सहभागातून खुर्दळीतील जनमाता देवीचा सोहळा केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारा ठरला.




