34.7 C
Pune
Friday, May 15, 2026
Home ठळक बातम्या डेंग्यू संदर्भात आवाहन

डेंग्यू संदर्भात आवाहन

0
234

 

डेंग्यू संदर्भात महापौर – उपमहपौरांनी घेतली आढावा बैठक

 

प्रतिबंधात्मक उपाय योजना प्रभावीपणे राबविण्याचे महापौरांचे निर्देश

रुग्णालयांशी समन्वय साधण्याच्या सूचना

लातूर/प्रतिनिधी: महापौर विक्रांत गोजमगुंडे व उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी डेंग्यू साथीच्या पार्श्वभूमीवर पालिका मुख्यालयात आढावा बैठक घेवून डेंगु निर्मुलनासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. शहरातील रुग्णालयांशी समन्वय साधून डेंग्यूसदृश रुग्णांची माहिती संकलित करण्याच्या सूचनाही त्यांनी या बैठकीत दिल्या.

पावसाळ्यामध्ये साथीचे विविध आजार डोके वर काढतात.लातूर शहरात मागील काही दिवसात डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत.या पार्श्वभूमीवर महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी ही बैठक बोलावली होती.उपमहापौर चंद्रकांत बिराजदार व आयुक्त अमन मित्तल यांचीही या बैठकीस उपस्थिती होती. डेंग्यू संदर्भातील सद्यस्थितीची माहिती महापौरांनी यावेळी घेतली. डेंग्यूचे रुग्ण वाढू नयेत यासाठी महानगरपालिकेच्या वतीने केल्या जाणाऱ्या प्रतिबंधात्मक उपाययोजना संदर्भात अधिकाऱ्यांना त्यांनी विविध निर्देशही दिले.

डेंग्यूचे रुग्ण वाढू नयेत यासाठी शहरात धूर फवारणी व औषध फवारणी करावी. प्रत्येक घरामध्ये फवारणी करून घ्यावी,असे ते म्हणाले. पालिकेच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाय योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे झाली पाहिजे. आरोग्य व स्वच्छता विभागाची भूमिका या काळात अत्यंत महत्त्वाची आहे.पावसाळ्याच्या दिवसात पाणी साठून राहू नये.खुल्या जागामध्ये गवत वाढून डासांचा प्रादुर्भाव होऊ नये,यासाठी स्वच्छता विभागाने दक्ष रहावे. डेंग्यूसदृश रुग्ण आढळला तर आरोग्य विभागाने तात्काळ उपचारास प्रारंभ करावा. संशयित रुग्णांच्या तपासण्या केल्या जाव्यात.रक्ताचे नमुने घेऊन डेंग्यूसदृश रुग्णास उपचारासाठी दाखल करून घ्यावे,असे निर्देशही त्यांनी दिले.

शहरातील अनेक रुग्ण खासगी रुग्णालयातून उपचार घेत आहेत.संबंधित रुग्णालयांशी समन्वय साधून डेंग्यूसदृश रुग्णांची माहिती संकलित करावी,असे निर्देशही महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी या बैठकीत दिले.

मनपा मुख्यालयात झालेल्या या बैठकीस नगरसेवक,आरोग्य व स्वच्छता विभागाचे अधिकारी आणि कर्मचार्‍यांचीही उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]