
शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भाजपचे माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांचे आज दुःखद निधन झाले. डॉ. गोपाळरावजी पाटील यांचे निधन म्हणजे एका युगाचा अंत आहे. माझ्या राजकीय जडणघडणीत त्यांचे मोलाचे योगदान होते. शिक्षण क्षेत्रात संस्थापक म्हणून, वैद्यकीय क्षेत्रात जेष्ठ बालरोगतज्ञ म्हणून आणि लोकसेवेत माजी खासदार म्हणून त्यांनी दिलेले योगदान अत्यंत मोलाचे व प्रेरणादायी आहे. असंख्य विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणारे, अनेक कुटुंबांना आधार देणारे आणि समाजासाठी आयुष्य समर्पित करणारे हे थोर व्यक्तिमत्व आज आपल्यात नाही. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!त्यांची कार्यनिष्ठा, दूरदृष्टी, साधेपणा आणि माणुसकीची जपणूक सदैव स्मरणात राहील. त्यांनी निर्माण केलेला आदर्श पुढील पिढ्यांसाठी प्रेरणास्थान राहील. डॉ. गोपाळराव पाटील यांच्यामुळे लातूरच्या ग्रामीण भागात भाजपची पाळेमुळे खऱ्या अर्थाने घट्ट रुजली. भाजपच्या विचारधारेवर चालणाऱ्या आम्हा सर्व कार्यकर्त्यांसाठी ते एक भक्कम आधारवड होते. माझ्यासाठी ते पितृतुल्य होते, आणि माझ्या वैयक्तिक जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे.आदरणीय डॉ. गोपाळरावजी पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली! ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो.#भावपूर्ण_श्रद्धांजली

आमदार अभिमन्यू पवार
लातूर जिल्ह्याच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्राला दिशा देणारे, शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे.“लातूर पॅटर्न” देशभरात पोहोचवण्यात त्यांच्या कार्याचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या निधनाने लातूर जिल्ह्याची मोठी व कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे.ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो, हीच प्रार्थना.ओम् शांति…

डॉ अर्चनाताई पाटील चाकूरकर
लातूर जिल्ह्याचे माजी खासदार, ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ आणि शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष आदरणीय डॉ. गोपाळरावजी पाटील साहेब यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी आहे. त्यांच्या जाण्याने लातूरच्या शैक्षणिक, वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील एका सुसंस्कृत पर्वाचा अंत झाला असून जिल्ह्याचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे.
रुग्णसेवा आणि शिक्षण प्रसाराचा ध्यास घेतलेल्या या महान लोकनेत्याने आयुष्यभर केवळ समाजाच्या हिताचा विचार केला. त्यांच्या रूपाने लातूरच्या प्रगतीचा एक भक्कम आधारस्तंभ आज निखळला आहे. आदरणीय डॉ. साहेबांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन आणि भावपूर्ण श्रद्धांजली! ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि पाटील परिवाराला हे दुःख सोसण्याची शक्ती देवो हीच प्रार्थना.

आमदार रमेश अप्पा कराड
लातूर शैक्षणिक पॅटर्नचे खरे शिल्पकार डॉ. गोपाळराव पाटील यांना आमदार अमित देशमुख यांची भावपूर्ण श्रद्धांजलीलातूर: शिक्षणमहर्षी या उपाधीला साजेसे महान कार्य करणारे, शिक्षण क्षेत्रातील थोर मार्गदर्शक, तत्त्वज्ञ आणि ज्येष्ठ बालरोग तज्ज्ञ, माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखदायक आहे. त्यांच्या निधनाने लातूरच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली असून, लातूर शैक्षणिक पॅटर्नचा एक दीपस्तंभ निमाला आहे, अशा शब्दांत माजी मंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.निस्वार्थ सेवेचे व्रत: वैद्यकीय ते शैक्षणिक प्रवासडॉ. गोपाळराव पाटील यांनी अनेक दशके वैद्यकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात निस्वार्थ भावनेने कार्य केले. लातूर शहरातील जुन्या पिढीतील नामवंत बालरोग तज्ज्ञ म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली होती. विशेषतः लातूर-धाराशिव जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेची आर्थिक स्थिती ओळखून त्यांनी अत्यंत कमी शुल्कात आरोग्य सेवा दिली, जी आजही लोकांच्या स्मरणात आहे.’शाहू पॅटर्न’ला जागतिक ओळख मिळवून दिलीशिवछत्रपती शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर डॉ. पाटील यांनी राजर्षी शाहू महाराज, जिजामाता, यशवंतराव चव्हाण आणि संत तुकाराम महाराज यांच्या विचारांची प्रत्यक्ष अंमलबजावणी शिक्षण क्षेत्रात केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ‘राजर्षी शाहू महाविद्यालया’ची कीर्ती केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देश आणि जागतिक पातळीवर पोहोचली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची दारे उघडून देत हजारो डॉक्टर्स, इंजिनिअर्स आणि प्रशासकीय अधिकारी घडवण्याचे श्रेय त्यांना जाते. ‘लातूर शैक्षणिक पॅटर्न’चे ते खरे शिल्पकार होते, असे प्रतिपादन आमदार अमित देशमुख यांनी केले.संसदेतील अभ्यासू नेतृत्वडॉ. पाटील यांनी राज्यसभेचे खासदार म्हणून काम करताना आपल्या अभ्यासू वृत्तीने संसदेतही वेगळा ठसा उमटवला होता. त्यांच्या कामाचा आवाका आणि विषयांची मांडणी सदैव कौतुकास्पद राहिली.विलासराव देशमुख साहेबांशी स्नेहाचे ऋणानुबंधलोकनेते विलासराव देशमुख साहेब आणि डॉ. गोपाळराव पाटील यांचे अत्यंत स्नेहाचे संबंध होते. लातूरच्या शैक्षणिक आणि सामाजिक जडणघडणीत या दोन्ही नेत्यांनी नेहमीच चर्चा आणि विचारविनिमय करून अनेक प्रकल्प मार्गी लावले. डॉ. पाटील यांच्या सूचनांचा आदर राखून साहेबांनी लातूरच्या शैक्षणिक विकासासाठी शासनस्तरावरून अनेक सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या.आमदार अमित देशमुख यांनी श्रद्धांजली वाहताना म्हटले की, “आदरणीय डॉ. गोपाळराव पाटील यांचे कार्य आणि विचार येणाऱ्या पिढीसाठी कायम दीपस्तंभ म्हणून प्रेरणादायी राहतील. त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात मी आणि माझा संपूर्ण परिवार सहभागी आहोत. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, हीच प्रार्थना.”

आमदार अमित विलासराव देशमुख
राजश्री शाहू महाविद्यालय लातूर ,शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, बालरोग तज्ज्ञ,तथा माजी खासदार डॉ.श्री.गोपाळरावजी पाटील यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले आहे. अतिशय प्रामाणिकपणे, नि:स्वार्थपणे शिक्षण संस्था कशी चालवावी याचा आदर्श मराठवाड्यात आदरणीय गोपाळरावजी पाटील साहेब यांनी संपूर्ण महाराष्ट्राला घालून दिला. यामुळेच निर्मोही, निष्काम कर्मयोगी म्हणून संपूर्ण महाराष्ट्र त्यांना ओळखतो. अत्यंत शिस्त बद्ध जीवनशैली, आधुनिक ज्ञान विज्ञानाचे अद्ययावत ज्ञान, प्रचंड वाचन, तीव्र स्मरणशक्ती, अत्यंत साधे, सोज्वळ पण व्यवहाराने कठोर,तत्वनिष्ठ जीवन अप्पांनी जगले. लातूर पॅटर्न म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संपूर्ण महाराष्ट्रात प्राचार्यांच्या कामकाजात त्यांनी कधीही हस्तक्षेप केलेले नाही असे अध्यक्ष दुसरे होणे नाही. अत्यंत निष्काम व्यक्तिमत्त्वाचा,निस्वार्थ भावनेचा, तत्त्वनिष्ठ विचाराचा, सोज्वळ मनाचा माणूसकी जपणारा उत्तम डॉक्टर पुन्हा होणे नाही. आदरणीय गोपाळराव पाटलांना भावपूर्ण श्रद्धांजली…

प्रा. जयद्रथ जाधव, साहित्यिक




