ड्रोनमुळे बदलणार शेतीचे स्वरूप : अत्याधुनिक शेतीला सुरुवात
माजी सनदी अधिकारी शेखर गायकवाड यांचे प्रतिपादन
सेरेब्रोस्पार्क इनोव्हेशनतर्फे ‘महाराष्ट्र कृषी ड्रोन क्रांती मिशन’
: ‘महा ड्रोन यात्रे’चा शुभारंभ;
१०० तरुणांना कृषी ड्रोनचे होणार वितरण
पुणे, १ मे: “भारतीय शेतीला वाढत्या अन्न उत्पादनाची तीव्र गरज आहे. कार्यक्षमता आणि उत्पादकता वाढवण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करावा. अचूक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी, खर्च कमी करण्यासाठी आणि शाश्वतता सुधारण्यासाठी ड्रोन हे एक क्रांतिकारक साधन म्हणून उदयास येत आहे. ड्रोनमुळे अचूक शेती, पीक निरीक्षण आणि कीटकनाशक फवारणी करणे शक्य होते,” असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी शेखर गायकवाड यांनी केले.

राज्यातील शेती क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन शेतकऱ्यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने सेरेब्रोस्पार्क इनोव्हेशन्सतर्फे ‘महाराष्ट्र कृषी ड्रोन क्रांती मिशन’ अंतर्गत १०० कृषी ड्रोन वितरण उपक्रमाचा शुभारंभ महाराष्ट्र दिनी, म्हणजे १ मे रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणातील सभागृहात करण्यात आला. यावेळी राज्यव्यापी ‘महा ड्रोन यात्रे’चा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला.

या प्रसंगी शेखर गायकवाड प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी माजी ब्रिगेडियर विरेश श्रीवास्तव, माजी सनदी अधिकारी उमेशचंद्र सारंगी आणि महेश झगडे हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच सेरेब्रोस्पार्क इनोव्हेशन्सचे सहसंस्थापक संचालक गणेश थोरात आणि मिहीर केदार तसेच ऋषिकेश सोनावणे उपस्थित होते.या मिशन अंतर्गत १०० गरजू व होतकरू तरुणांना १०० कृषी ड्रोन वितरित करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

शेखर गायकवाड म्हणाले, “भारतीय कृषी क्षेत्रातील ड्रोन तंत्रज्ञानातील तांत्रिक प्रगती, नियामक चौकट, पायाभूत सुविधा, शेतकऱ्यांचा दृष्टिकोन आणि आर्थिक उपलब्धता यांचे मूल्यांकन आवश्यक आहे. ड्रोनचा अवलंब केल्याने कार्यक्षमता आणि शाश्वतता वाढते, परंतु जास्त खर्च, प्रशिक्षणाचा अभाव आणि नियामक अडथळे यांसारखी आव्हाने त्याच्या व्यापक अंमलबजावणीत अडसर ठरतात.””इस्रायल देशाप्रमाणे भारतात ‘प्रिसिजन फार्मिंग’ पद्धत आणल्यास अद्वितीय बदल घडेल. यामुळे शेतकरी केवळ २० मिनिटांत शेतातील काम करून आर्थिक खर्च कमी करू शकतो,”

महेश झगडे म्हणाले, “ड्रोनमुळे नक्कीच कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडणार आहे. परंतु बाजारपेठेचा विचार करता इनोव्हेशन, सरकारी योजना, आर अँड डी, मार्केटिंग, सबसिडी यांवर अधिक भर देणे गरजेचे आहे. त्यातच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर मोठ्या प्रमाणात करावा.”गणेश थोरात यांनी सांगितले की, “महाराष्ट्र कृषी ड्रोन क्रांतीची सुरुवात ही राज्याच्या कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नवी क्रांती घडवणारा एक ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे. सेरेब्रोस्पार्क इनोव्हेशन गेल्या ६ वर्षांपासून ८० ते १०० किलोपर्यंत विविध क्षमतेचे ड्रोन विकसित करत आहे. कृषी, सुरक्षा आणि औद्योगिक क्षेत्रात आम्ही यशस्वी कार्य करीत आहोत. डीजीसीए मान्यताप्राप्त प्रशिक्षण संस्था म्हणून आम्ही ड्रोन पायलट प्रशिक्षणही देतो. विविध उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण भागात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून परिवर्तन घडवण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत.”मिहीर केदार यांनी सांगितले की,

“‘महा ड्रोन यात्रे’मध्ये विशेष सुसज्ज वाहने संपूर्ण महाराष्ट्रभर प्रवास करून प्रत्येक गावात ड्रोनचे प्रात्यक्षिक सादर करतील. यामुळे शेतकऱ्यांना ड्रोन तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती मिळेल आणि आधुनिक शेती पद्धतींचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल. त्याचप्रमाणे शेती अधिक कार्यक्षम व सुरक्षित बनेल.” ड्रोन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शेतीतील मनुष्यबळाचा ताण कमी होण्यास मदत होईल. तसेच वेळेची बचत, अचूक फवारणी आणि उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी ते उपयुक्त ठरेल. भविष्यात कृषी क्षेत्रात ड्रोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचे मत उमेशचंद्र सारंगी आणि ब्रिगेडियर विरेश श्रीवास्तव यांनी मांडले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेहा जकाते यांनी केले, तर ऋषिकेश सोनावणे यांनी आभार मानले.बॉक्समहा ड्रोन यात्रेचा शुभारंभ’महा ड्रोन यात्रे’अंतर्गत विशेष सुसज्ज वाहने संपूर्ण महाराष्ट्रात फिरणार आहेत. गावागावांतून कृषी ड्रोनचे थेट प्रात्यक्षिक सादर केले जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना ड्रोनच्या साहाय्याने औषध फवारणी, पीक निरीक्षण, खत व्यवस्थापन आणि शेती नियोजन कसे करावे याचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश आधुनिक शेती पद्धतींची माहिती ग्रामीण भागापर्यंत पोहोचवणे हा आहे. ‘एक गाव, एक ड्रोन’ ही संकल्पना महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा, प्रत्येक तालुका आणि प्रत्येक गावात पोहोचवली जाणार आहे. तसेच या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातील शेतकरी तसेच ग्रामीण भागातील युवक-युवतींना आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. कृषी क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर वाढवून शेती अधिक कार्यक्षम, सुरक्षित आणि कमी खर्चिक करण्यावर या मोहिमेचा भर आहे.




