Homeराजकीयभाजपाचे मनपा इमारतीत कुत्रे आणून आंदोलन

भाजपाचे मनपा इमारतीत कुत्रे आणून आंदोलन

तर मोकाट कुत्रे मनपा सत्ताधाऱ्यांच्या घरात सोडणार

भाजपाचे मनपा इमारतीत कुत्रे आणून आंदोलन

लातूर दि.05-06-2026निवडणूक काळात मोठ मोठी आश्वासने देवून लातूरकरांची दिशाभूल करून मनपात सत्तेत आलेल्या काँग्रेसने लातूरकरांना वार्‍यावर सोडलेले पाहण्यास मिळत आहे. सत्ता प्राप्त होऊन 141 दिवस लोटले असले तरी प्रश्न मात्र कायम असल्याचे सांगून या काळात स्थानिक सत्ताधारी व अधिकार्‍यांच्या निष्क्रयतेमुळे तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

शहरातील मोकाट कुत्र्याने एकाचा तर खड्ड्याने दोन चिमुकल्यांना मृत्यूला सामोरे जावे लागले होते. याबाबत सत्ताधारी व अधिकार्‍यांकडून कोणतीच ठोस कारवाई न झाल्यामुळे शहर जिल्हा भाजपा हे आंदोलन केवळ इशारा देण्यासाठी केले असून आगामी काळात यापेक्षा तीव्र आंदोलन करत शहरातील मोकाट कुत्रे सत्ताधारी व अधिकार्‍यांच्या घरात सोडण्यात येतील, असा इशारा भाजपा शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी दिला आहे.

शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा या मागणीसाठी भाजपाच्यावतीने शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांच्या मार्गदर्शनात तर विरोधी पक्षनेते देविदास काळे व गटनेते अ‍ॅड. दिपक मठपती यांच्या नेतृत्वात मनपा आवारात मोकाट कुत्रे आणून आंदोलन केले. या आंदोलनावेळी अजित पाटील कव्हेकर बोलत होते.मनपातील सत्ताधारी व निष्क्रीय अधिकार्‍यांवर टीका करत हा इशारा देत अजित पाटील कव्हेकर म्हणाले की, लातूरचे आमदार म्हणून मिरवणारे अमित देशमुख यांनी मनपा निवडणुकीच्या काळात आश्वासनांचा पाऊस पाडत लातूरकरांची दिशाभूल करून मनपात सत्ता प्राप्त केली.

मनपात काँग्रेसला सत्तेत येवून 141 दिवस लोटले असले तरी अद्यापपर्यंत एकाही आश्वासनांची पूर्तता त्यांच्याकडून झालेली नाही. याउलट विकासकामात खोडा घालत लातूरकरांना वेठीस धरण्याचे काम सत्ताधारी काँग्रेसकडून झाले आहे. लातूरमधील अनेक प्रश्न अधिक जटील झालेले असून ते सोडविण्यात सत्ताधारी अपयशी ठरलेले आहेत. किंबहूना त्यांना हे प्रश्न सोडविण्यासाठी वेळ नसून केवळ आपले खिसे भरण्यात ते मग्न असल्याचे सांगितले. सत्ताधार्‍यांचा प्रशासनावर अंकुश नसल्यामुळे अधिकारीही असेंदनशिल झाले असून त्यांच्याकडूनही नागरिकांना सुविधा पुरविण्यासाठी किंवा त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कागदी घोडे नाचविले जात असल्याचा आरोप अजित पाटील यांनी केला. सत्ताधारी आणि अधिकार्‍यांच्या या अकार्यक्षमतेमुळे मागील काही दिवसांत लातूरमधील तीन निष्पाप नागरिकांचा बळी गेला असून आगामी काळात नागरिकांचे प्रश्न मार्गी न लावल्यास आणि मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त न झाल्यास हेच मोकाट कुत्रे सत्ताधारी व अधिकार्‍यांच्या घरात सोडण्यात येतील, असा इशारा शहर जिल्हाध्यक्ष कव्हेकर यांनी दिला.

विरोधी पक्षनेते देविदास काळे यांनी सत्ताधारी व अधिकार्‍यांच्या कारभाराचा पंचनामा करत या दोघांची मिलीभगत असल्याचा आरोप करत यामुळे लातूरकरांना वेठीस धरले जावू लागले आहे. सर्वसाधारण सभेत भाजपाच्या नगरसेवकांनी मोकाट कुत्र्यांचा प्रश्न उपस्थित केला असता याबाबत कोणतेच गांभीर्य न दाखवता सत्ताधारी व अधिकारी यांनी या विषयाकडे कानाडोळा केला. त्याच वेळी याबाबत कारवाई झाली असती तर एका निष्पाप जिवाचा बळी गेला नसता, असेही देविदास काळे म्हणाले. मोकाट कुत्र्यांमुळे ज्या युवकाचा बळी गेला आहे त्याच्या परिवारालाही मनपाचे सत्ताधारी व प्रशासनाकडून कोणताच दिलासा मिळाला नाही. विशेष म्हणजे प्रशासनाने या विषयी चौकशी समिती गठीत करून दोषींवर कारवाई करण्याचा शब्द दिला होता. सत्ताधार्‍यांना लातूरकरांशी काही देणेघेणे नसल्याने प्रशासनातील अधिकारीही लातूरकरांना वेड्यात काढण्याचे काम करत असल्याचे सांगून आगामी काळात यापेक्षा अधिक तिव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देविदास काळे यांनी दिला आहे.

याप्रसंगी गटनेते अ‍ॅड. दिपक मठपती, नगरसेवक रविशंकर जाधव, गिरीष पाटील,गणेश गवारे, शोभा पाटील, शितल मालू, स्वाती घोरपडे आदींनी मनपातील सत्ताधारी व अधिकारी यांच्यावर टीकेची झोड उठवली. या आंदोलनात सरचिटणीस संजय गीर, नगरसेवक उध्दव तेलंगे, भीमाशंकर बेंबळकर, संगीता मिरचे, ऋषिकेश राजे, मंडलाध्यक्ष सुरेश जाधव, चंद्रकांत साळुंके, राहूल भुतडा, रोहीत पाटील,दत्ता चेवले, पवन आल्टे, अंकित बाहेती, प्रमोद गुडे, पुनित पाटील, ललित तोष्णीवाल, किशोर शिंदे, विजयकुमार अवचारे, ज्योतीराम चिवडे, संतोष तिवारी, सिमा करपे आदींसह नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर आंदोलनाची सुरुवात महात्मा गांधी चौक येथून करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments