लातूर RTO प्रकरणाला नवे वळण; लाचखोरीच्या आरोपांनंतर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
लातूर/पुणे, प्रतिनिधी : लातूर येथील प्रादेशिक परिवहन विभाग (RTO) आणि एका खासगी प्रवासी बस चालक यांच्यातील वादाला नवे वळण मिळाले असून, लाचखोरीच्या आरोपांनंतर आता संबंधित चालकाविरुद्ध लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी दावे करण्यात आल्याने संपूर्ण घटनेची निष्पक्ष चौकशी होण्याची मागणी होत आहे.
४ जून २०२६ रोजी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा स्वातंत्र्य सैनिक प्रदीप पाटील खंडापूरकर यांनी लातूर RTO मधील एका अधिकाऱ्यावर ३५ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप केला होता. या संदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रकरण चर्चेत आले होते.त्यानंतर संबंधित ट्रॅव्हल्स चालक व मालक यांनी लातूर आणि पुणे येथील काही RTO अधिकाऱ्यांनी सूडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, पुणे परिसरात ट्रॅव्हल्स वाहन अडवून महिलांसह सुमारे ४० प्रवाशांना रात्रीच्या वेळी खाली उतरवण्यात आले तसेच चालकाला धमकावण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
दरम्यान, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. विभागाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात संबंधित वाहनाकडे महाराष्ट्र राज्याचा वैध परवाना नसल्याचे तसेच आवश्यक कर भरलेला नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन झाल्यामुळे नियमानुसार ₹३५,९६० दंड आकारण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.प्रशासनाच्या माहितीनुसार, दंडाची रक्कम वाहनधारकाने ऑनलाइन पद्धतीने शासनाच्या खात्यात भरली असून त्याची नोंद उपलब्ध आहे. तसेच संबंधित वाहनावर यापूर्वीही विविध तारखांना दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
याशिवाय, परिवहन विभागाची बदनामी केल्याचा आरोप करत संबंधित चालकाविरुद्ध लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती विभागाने दिली आहे. नागरिकांनी अपूर्ण किंवा अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.दुसरीकडे, तक्रारदारांनी RTO अधिकाऱ्यांविरोधातील आरोप कायम ठेवत या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच आवश्यक असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) आणि वरिष्ठ परिवहन अधिकाऱ्यांकडेही दाद मागण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.या संपूर्ण प्रकरणात दोन्ही बाजूंनी गंभीर आरोप-प्रत्यारोप करण्यात आले असून सत्य परिस्थिती चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे.





